मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अखेर ‘हातमिळवणी’ झाली आहे. टिळक भवन येथे या दोन्ही नेत्यांनी बुधवारी एकत्र पत्रकार परिषद घेतली. थोरातांनी नाराजीचे पत्र पाठवले असे तुम्हाला कोणी सांगितले? तुमच्याकडे राजीनाम्याची प्रत आहे का? असा सवाल पटोले यांनी पत्रकारांना केला. सगळं काही आलबेल आहे, असे दाखवण्याचा यावेळी प्रयत्न झाला.काँग्रेसमधील गृहकलहाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज टिळक भवनात होणाऱया प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नेमके काय घडत्sै याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे प्रमुख नेते उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाली आणि त्यानंतर पटोले व थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आमच्यात कोणताही वाद नसल्याचे सांगितले. काँग्रेस हायकमांडने पटोले-थोरात यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रभारी एच. के. पाटील यांना मुंबईत धाडले होते. पाटील यांनी थोरात यांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली व त्यांना आश्वस्तही केले. त्यानंतर थोरात यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज बैठकीला ते उपस्थित नव्हते.
तुम्ही नाराज असल्याचा प्रश्न पत्रकारांनी बाळासाहेब थोरात यांना केला असता मी नाराज नव्हतोच, असे उत्तर त्यांनी दिले. माझ्या नाराजीच्या चर्चा या मला मीडियाच्या मार्फत कळत होत्या. त्या कोणी दिल्या मला माहीत नाही, असेही ते म्हणाले. प्रत्येक संघटनेत पत्रव्यवहार होत असतो तसा आम्ही केल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्यात वाद व्हावा म्हणून भाजपने प्रयत्न केले, पण ते पह्ल ठरले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही, असेही थोरात यांनी पुढे नमूद केले.
तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला भीती वाटू लागली आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. निवडणुका एकत्रित घेतल्या जातील अशी शक्यता आहे असे सांगतानाच त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.