Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपा-राष्ट्रवादी संभाव्य मंत्रिमंडळात पालकमंत्री सुद्धा ठरले होते, या नेत्याचा खुलासा

0

शरद पवार साहेबांनी आमच्याशी डबल गेम केला. शरद पवार यांच्या पुढाकारानेच राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती. पण शरद पवार चार दिवस आधी मागे फिरले. त्यामुळे पुढच्या गोष्टी जमल्या नाहीत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रिपब्लिकन भारत यान वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडालेली असतानाच आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवा दावा केला आहे. मुनगंटीवार यांनी हा दावा करतानाच शरद पवार यांच्याकडेच बोट दाखवलं आहे.

शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. पवार साहेबांनी पालकमंत्री आणि जिल्हे वाटप सुद्धा केले होते. त्यानंतर ते माघार फिरले. देवेंद्र फडणवीस यांनी आज जे काही सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते. शरद पवार यांचा जो काही राजकीय प्रवास आहे, इतिहास आहे, ते पाहिलं तर फडणवीस जे म्हणत आहेत ते खरं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच यावेळी मुनंगटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जातील असं आम्हांला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठं मन केलं. त्यांना जागा दिल्या. पण तेव्हाही बेइमानी झाली. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवारही दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून दिला होता. कोणत्याही राजकीय पक्षात असं कधी होत नाही. पण आम्ही ते केलं, असं मुनगंटीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.