भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरणार; सायन्स कॉंग्रेस उदघाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन
नवी दिल्ली | भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात पंतप्रधान व्हर्च्युअली सहभागी झाले होते.
व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री, डॉ जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन ISCA (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती.
मान्यवरांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, ‘पुढील 25 वर्षात भारत ज्या उंचीवर पोहोचणार आहेत. त्यात देशाच्या वैज्ञानिक शक्तीची भूमिका महत्वाची असणार आहे. संशोधन क्षेत्रात आवडीसह त्याला देशसेवेच्या संकल्पाची जोड दिल्यास अभूतपूर्व निकाल येईल. सध्या डेटा एनालिसिस क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. भारताकडे डेटा आणि तंत्रज्ञान दोन्हीचा विकास होत आहे. त्याद्वारे येत्या काही वर्षात देश एका नव्या उंचीवर पोहचणार असल्याचा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.