आघाडीचे ठाकरे सरकार कोसळून नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्यांचा काळ लोटला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अनेक मंडळांना, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या.आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच काँग्रेस खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, भाजप अशी अवस्था करून ठेवली आहे की, त्यांना थेट चारधाम यात्रेला जावे लागेल, असा टोला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. महंतांचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत. यावरून काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याबाबत इम्रान प्रतापगढी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारतीय जनता पक्षाने त्यांची अशी अवस्था करून ठेवली आहे की, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल, असा टोला प्रतापगढी यांनी यावेळी लगावला. मुंबई महानगपालिका निवडणुकांवर भाष्य करताना, आम्ही मुंबईत पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे ते म्हणतात.