बार्शीचे उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा “महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025” जाहीर : दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते पुण्यामध्ये होणार वितरण सोहळा!
हिंदवी समाचार : बार्शी,
बार्शी तालुक्यातील खामगाव या खेडेगावातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलेले यशस्वी उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते पुणे येथे दिनांक 25 मे 2025 रोजी, शाही थाटात पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असल्याचे संघटनेचे सर्वेसर्वा तथा संस्थापक / अध्यक्ष राजा माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या संतोष ठोंबरे यांना सुरुवातीपासूनच उद्योग आणि व्यवसायाची आवड होती. वाहनचालकापासून केलेली सुरुवात, आज जागतिक पातळीवर 1 नंबर चे उद्योजक म्हणून त्यांचा व्यवसाय पोहोचला आहे. कुबोटा ट्रॅक्टर विक्रीमध्ये सलग तीन वर्षे जगामध्ये क्रमांक 1 पटकावला आहे. मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना करून, गोरगरीब वंचितांना गेली अनेक वर्षांपासून मातृभूमी अन्नछत्रलयाच्या माध्यमातून मोफत अन्नदान केले जाते. सामाजिक क्षेत्राची आवड असणाऱ्या ठोंबरे यांनी तब्बल 11 एकर जागेमध्ये भव्य अशा क्रीडा संकुल उभारणीची सुरुवात केली आहे. तसेच व्याख्यानमालेच्या माध्यमातून बार्शीकरणा नेहमीच वैचारिक शिदोरीत देण्याचे काम मातृभूमी प्रतिष्ठान सातत्याने करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे निवड समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संतोष ठोंबरे यांच्या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.