बार्शी (सचिन अपसिंगकर) –
नुकतेच बार्शी शहरात अवैध गर्भपात सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकून बार्शी पोलिसांनी पुराव्यासह आरोपी पकडले आहेत. यापूर्वी स्वामी नावाच्या तोतया डॉक्टरने फिरते गर्भलिंग निदान चाचणी मशीनद्वारे अनेक महिलांकडून पैसे उकळल्याचे ही प्रकरण उजेडात आले होते. भूम येथे आपल्या या अवैध व्यवसायातील हस्तकाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा ही दाखल झाला होता. बार्शी शहरात नुकतेच उजेडात आलेले हे अवैध गर्भपात केंद्र हे अशा घटनांचे जिल्हयातले केंद्रस्थान आहे का ? याचा सखोल तपास होणे गरजेचं आहे. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तत्परतेने तपास केला असून पाच आरोपींना अटकही केली आहे.
मात्र केवळ या एका घटनेभोवती तपास मर्यादित न राहता या प्रकरणात सामील दलालांची संख्या नेमकी किती आहे ? हे दलाल केवळ सोलापूर जिल्हयातीलच आहेत की इतर जिल्ह्यामध्येही या दलालांची साखळी आहे. याची चौकशी झाली पाहिजे. या अवैध गर्भपातांपूर्वी गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या, या अगदी सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आणि स्पष्ट आहे. मात्र केवळ गर्भलिंग निदानपासून मशीन हाताळनार्या व्यक्ति या वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित कर्मचारी आहेत, की त्यांना इतर कोणत्या वैद्यकीय यंत्रणेचे अनधिकृतरित्या पाठबळ लागते आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे. आज ही गर्भलिंग निदान चाचणी करून घेण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झालेली आहे, ही वस्तुस्थिति आहे, आणि अशा मानसिकतेमधून स्त्रीभ्रूणहत्या केल्या जातात.
आणि त्यामुळे अशा अवैध चाचण्या करून घेण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने सहजा-सहजी उपलब्ध होत असतात. हे कटूसत्य आहे. मात्र या गैरप्रकारांना कदापिहि समाजमान्यता मिळता कामा नये. यासाठी कायद्याच्या बडग्याचीच गरज आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे दांपत्याने याबाबत कहर आणि कळस केला होता. बार्शी सारख्या शिक्षण, आणि आरोग्य संस्कृतीचे जिल्ह्यातील माहेरघर असलेल्या शहरामध्ये या विकृती मूळापासून उपटून टाकण्याची गरज आहे. तसेच हे अवैध गर्भपात केवळ विवाहित महिलांचेच स्त्रीभ्रूण ओळखून केले जात होते. की वेगवेगळ्या लैंगिक, अत्याचार, बलात्कार, व अन्य शारीरिक शोषण चक्रव्यूहात सापडलेल्या अल्पवयीन मुली, युवती, व महिला यांच्या अवैध गर्भपातांच्या घटनांशी ही साखळी जोडली गेली होती का? याचा ही मूळापासून तपास होण्याची गरज आहे.