मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दोघेही अयोध्या दौऱ्यावर होते. काल त्यांनी राम लल्लाचे दर्शन घेऊन शरयू नदीकिनारी आरती सुद्धा केली होती तर दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्यावर महाविकास आघाडीने जोरदार हल्ला चढवला होता. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी या दौऱ्यावर जोरदार प्रहार चढवला आहे. सध्या अजित पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधताना आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आताच्या ताज्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा हा अयोध्या दौरा होता. प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार.. तिकडे जाणार.. हे सांगत नाही. आम्ही पण मंदिरात जातो, पण पब्लिसिटी करत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यास, द्वेष पसरवण्यास कोणी करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे’. अशी भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील अयोध्या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी राम मंदिराच्या निर्माणाची पाहणीही देखील केली. मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. सध्या संपूर्ण राज्यात शिंदे गटाच्या या दौऱ्यावर चर्चा होताना दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. अश्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा अयोध्या दौऱ्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.