शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज दापोलीत जात आहेत. सोमय्या यावेळी खेड ते दापोली असा पायी दौराही काढणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते.
तसेच या रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. परब यांचा रिसॉर्ट हा दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. पुढील आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. यामध्ये परब यांच्या रिसॉर्टच्या तोडक कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दापोली दौऱ्यासाठी सोमय्या हे ट्रेनने सकाळी 7.55 वाजता ठाण्याकडून खेडकडे रवाना झालेत. सकाळी 11.48 वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकात त्यांचे आगमन होणार होईल. खेड ते दापोलीपर्यंत ठिकठिकाणी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मुरुड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साई रिसॉर्टला सोमय्या भेट देणार आहेत. यावेळी काही अधिकारीदेखील असण्याची शक्यता आहे.