Latest Marathi News

BREAKING NEWS

अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार ?

0

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह शिवसैनिकांवर पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. आता अनिल परब यांच्यासह इतर सहा जणांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

अनिल परब यांच्या अटकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर ३० जून रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे अनिल परब यांना दिलासा मिळणार की त्यांचा अर्ज फेटाळून लावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या वांद्रे पूर्व परिसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून त्या शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवून कारवाई करण्यात आली होती.

शाखेवर कारवाई करताना त्या शाखेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवरायांचा फोटो न काढता हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन शाखा पाडण्याच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याला या प्रकरणात जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

प्रकरण असे की, ठाकरे गटाची वांद्रेतील शाखा अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेनं कारवाई केली. वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीनं बांधकाम करण्यात आलं. ते बांधकाम मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं. कुठलीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून त्याठिकाणी बोर्ड लावण्यात आले होते. शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती त्यातूनच कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.