मुंबई | अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून, आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे.
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी आपल्या पालिकेतील नोकरीचा महिन्याभरापूर्वीच राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून अद्यापही तो मंजूर झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक असल्यानं ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे. ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर व्हावा यासाठी अनिल परब यांनीदेखील पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्यापदी त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्यानं ठाकरे गटापुढील चिंता वाढली आहे.
१४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख तसेच ३ नोव्हेंबरला मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.