राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा, त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा आणि त्यानंतर राजीनामा मागे घेण्याची घोषणा, सर्व घडामोडींवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांना आता आमचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे आता ते आमच्यावर टीका करत सुटले, असे मोठे विधान करतानाच मुख्यमंत्री शेतात जाऊ शकत नाही का? मुख्यमंत्री काम करतात त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नये, असे आवाहन संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केले.
सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. त्यावर अनेकजण वेगवेगळे अंदाज लावत आहेत. निकालावर अंदाज वर्तवणाऱ्यांना शिरसाट यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपले राजकीय आणि कायदताबद्दलचे ज्ञान पाजळावे. आज सर्व जण सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) जज असल्यासारखे मत व्यक्त करत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. कायद्यानुसारच सर्व केलेले आहे. त्यामुळे आम्हाला निकालाची चिंता नाही. आता चिंता कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असे संजय शिरसाट म्हणाले.
पुढे बोलताना शिरसाठ म्हणाले की, विरोधक, कायदे तज्ज्ञ जे बोलत आहेत त्यांना माझा सल्ला आहे थोडे थांबा. निकाल आल्यानंतर बोला. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना आपल्या पक्षाच्या बाजूने बोलावेच लागेल. पण आधी निकाल येऊ द्या, मग बोला. सर्वांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले जाईल हीच खरी प्रक्रिया आहे. त्यामुळे याचा निर्णय हे विधानसभा अध्यक्षच घेतील, असा दावा शिरसाट यांनी केला.