अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात असे विधान भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते या विधानानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते यावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. एखाद्याच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील असंही राऊत म्हणाले. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात असेही राऊत म्हणाले.
सर्वांत जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी मजबूत आहे. आता सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत. सध्या मुख्यमंत्री पदाचा विषय नाही असेही राऊत म्हणाले. 2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ, त्यावेळी पाहू असेही संजय राऊत म्हणाले. वज्रमूठ सभा ही तीन पक्ष एकत्र घेऊन करत आहेत. तीन पक्षांचा निर्णय असतो की सभा कोठे घ्यायची? सभेत कोणी बोलायचे? हा तिघांचा निर्णय असतो. त्यामुळं कोणतेही वाद नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
उद्या (23 एप्रिल) उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावरही टीका केली. जळगाव आमचं आहे, शिवसेनेचं आहे. उद्या दुपारी उद्धव ठाकरे यांचे जळगावला आगमन होईल. तेथून ते पाचोऱ्याला जातील. उद्याची सभा मोठी होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. या सभेची पूर्ण तयारी झाल्याचे अजित पवार म्हणाले.