पुणे : कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे जणू सर्व जग ठप्प झाले होते, सर्व व्यवहार आणि विकास कामांना स्वल्पविराम लागला होता, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगीन अगेन, किंवा पुनःच हरी ओम म्हणत महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशातच पुणेकरांच्या आकर्षणाचा विषय असणारी ‘पुणे मेट्रो’ याचेही काम पूर्वपदावर आलेले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे स्टेशनपासून या कामाची पाहणी सुरू केली आहे. तसेच हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.
वाचा काय म्हणाले अजित पवार, पहा मेट्रोच्या कामाचे फोटोज.
आज, पुणे स्टेशनपासून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रोच्या कामाबाबत सविस्तर माहिती घेतली. मेट्रोच्या कामाचा आढावा घेताना शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेननं प्रवास केला. यासह शिवाजीनगर कृषी महाविद्यालयाजवळील बोगद्याचं काम, व्हील पार्क (वनाज) येथील कचरा डेपोचं अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आलेल्या कामाची देखील पाहणी केली.
