पुणे-सोलापूर महामार्गावरील १५ नंबर ते उरुळी कांचनदरम्यान अपघातरहित वाहतुकीसंदर्भात पोलीस खात्यासहित सर्व संबंधित शासकीय विभागांना कडक सूचना दिल्या आहेत. यानंतरही वाहतूक सुरळीत न झाल्यास संबंधित शासकीय खात्यांविरोधातील जनतेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करील, असा खणखणीत इशारा शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
लोणी काळभोर परिसरात सोलापूर महामार्गावर दोन शाळकरी सख्ख्या बहिणी व एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. यासंदर्भात महामार्गाची पाहणी करण्यासाठी डॉ. कोल्हे हे आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक अभिजीत आवटे, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, पदाधिकारी उपस्थित होते. अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केल्यानंतर उरुळी कांचन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी परिषदेला महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, 15 नंबर ते उरुळीदरम्यान महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी पुणे शहर पोलिसांचा वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित सर्व शासकीय विभागांना सूचना दिल्या आहेत. अपघात कमी करण्याबाबत उपाययोजनासाठी यंत्रणा काम करत आहेत. रम्बलर स्ट्रीप, स्पीड ब्रेकर आदी उपाय करण्यात येणार आहेत. हे उपाय करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींचे मत विचारात घेणार आहे.