शिवसेना प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे या काल अचानक शिंदे गटात दाखल झाल्या. शीतल म्हात्रेंनी शिंदे गटात केलेला प्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निष्ठा यात्रेनंतरच्या मेळाव्यात बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी अचानक भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. आता खुद्द शीतल म्हात्रे यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या बदललेल्या भूमिकेबाबत शीतल म्हात्रे म्हणाल्या की, हे मतपरिवर्तन अचानक झालेलं नाही. शिवसैनिक भावनाप्रधान असतो. त्यामुळेच बंडखोरी झाली तेव्हा सुरुवातीला आम्हालाही धक्का बसला. सर्वसामान्य शिवसैनिकांप्रमाणेच आम्हालाही वाईट वाटलं. मात्र हे कसं झालं आणि का झालं याबाबत बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका ऐकली तेव्हा ही भूमिका प्रत्येक नगरसेवक प्रत्येक शिवसैनिकाची आहे, असं आम्हाला वाटलं.
बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. आज सर्वस्व पणाला लावून हे लोक काम करत असतील तर त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांच्या बरोबरीने खारीचा वाटा उचलावा, असं आम्हाला वाटलं म्हणून मी आज शिंदे गटात सहभागी झाले आहे अशी प्रतिक्रियट्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली होती.
गेली पाच वर्षे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. मात्र नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरू होती. काही मुठभर लोकांच्या ताब्यात ही महानगरपालिका गेली होती. साहेबांना, मातोश्रीवर हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या नाहीत. पण त्यांच्यापर्यंत आमची भूमिका पोहोचवली नाही, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.