कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद उफाळून आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खडेबोल सुनावले.
संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटले की, भाजपच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ”कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.” भाजपचे हे ढोंग आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मुळात जे छत्रपती शिवरायांचा अवमान निमूट सहन करतात त्यांनी ‘कारे’ची भाषा करावी हाच एक विनोद आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे. शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. विरोधी पक्षाने आता नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करावा. अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल, असेही राऊत म्हणाले.
एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे, अशी टीकाही राऊत यांनी शिंदे सरकारवर केली.