Latest Marathi News

BREAKING NEWS

आपल्याला गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, याचे दु:ख आहे

0


ठाणे : विनयभंगाच्या गुन्ह्यात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळाल्याचा कोणताही आनंद नाही. उलट, अशा प्रकारच्या गुन्ह्यात आपल्याला गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, याचे दु:ख आहे. यामागे कोण शकुनी मामा आहे, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली.

आव्हाड म्हणाले की, आपण या गुन्ह्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज करणार नव्हतो. परंतु कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा अर्ज केला. संपूर्ण व्हिडीओमध्ये ती भगिनी समोरून चालत येताना दिसते. तिच्या मनात हे सगळे ठरलेले असावे. कारण मी तिला बाजूला केले नसते तर ती आपल्या अंगावरच पडली असती. नंतर एक मोठा गुन्हा आपल्यावर दाखल झाला असता. पण मी तिला बाजूला केले. मला अडकविण्यासाठी हे सगळे रचले होते. पण देवानेच मला वाचवल्याची भावना आव्हाड यांनी व्यक्त केली.

आपल्यावर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्यातून तडीपार करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावरच राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेऊ. कारण आपल्याशी बोलल्याशिवाय काही पाऊल उचलायचे नाही, असा वडीलकीचा सल्ला पवार यांनी दिल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.