आमच्याकडेही खोकेच्या खोके भरून येताहेत, पण हे शिवसैनिकांच्या निष्ठेचे खोके आहेत, त्यांचे खोके वेगळे आहेत,’ असा टोला फुटीरांना लगावतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपातील या निष्ठेच्या कागदपत्रांचे खोके असेच भरभरून येऊ द्यात. हे आताच्या घडीचे सगळय़ात आवश्यक काम आहे,’ असे आवाहन शिवसैनिकांना केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार ‘मातोश्री’ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आणि शिवसेना सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’ तसेच शिवसेना भवन येथे येत आहेत. आजही सांगलीतून पायी चालत आलेल्या शिवसैनिकांनी या प्रतिज्ञापत्रांचे खोकेच्या खोके ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, ऑफिडेव्हिट, सदस्य नोंदणीचे जी कागदपत्रे घेऊन आला आहात, हा आपला पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात आणखी ऑफिडेव्हिट गोळा करायची आहेत.
कोर्टात उद्या जे व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्या सोबत आहेत. निवडणुका कधी येताहेत आणि गद्दारांना धडा कधी शिकवतोय याची लोक वाट बघताहेत. पण निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत आहे असे मला तरी वाटत नाही, अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.