वन्समोअर आणि टाळ्यांच्या प्रतिसादात रंगली दिवाळी पहाट ; रंगाईच्या दिवाळी पहाटला लक्षवेधी ठरली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
ठाणे |
रंगाई निर्मित नरेश म्हस्के विराट सामाजिक संस्था आयोजित रंगात रंगली दिवाळी या रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या उपस्थितीनी ठाणेकरांची मने जिंकली. वाहतूक कोंडी मुक्त ठाणे व खड्डेमुक्त रस्ते अशी मागणी सभागृहातून येताच मुख्यमंत्र्यांनी लगेचच ही मागणी पूर्ण करण्याचा शब्द ठाणेकरांना दिला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करुन त्यांचे आभार व्यक्त केले.
नरेश म्हस्के विराट सामाजिक संस्था आयोजित रंगाई निर्मित रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन आज गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी महापौर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित होते. भक्तीगीते आणि भावगीतांच्या सुरेल मेजवानीसह अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि गिरीजा ओक यांच्याशी खुमासदार गप्पा अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळाली. कलाकार म्हणून काम करताना रसिकांनी दिलेल्या शुभेच्छा तसेच आपल्या आयुष्यात आलेले चांगले वाईट अनुभव सुप्रिया पाठारे व गिरीजा ओक यांनी कथन केले. रसिकांनी देखील टाळ्यांची दाद देत या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. गायिका केतकी भावे – जोशी, डॉ. जयराज आजगावकर, धनंजय म्हसकर, रंगाईचे सर्वेसर्वा दिगंबर प्रभू यांच्या नियोजनाखाली रंगलेल्या या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन स्मिता गवाणकर यांनी केले.
या कार्यक्रमाला लक्षवेधी ठरली ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी व ठाणेकर रसिकांना भेटण्यासाठी खास मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी मी माझे काम करत राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले. राज्याचा विकास हेच माझे ध्येय आहे, त्यामुळे राज्याच्या जनतेसाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविले जाणार आहेत. प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे ते बोरीवली असा भुयारी मार्ग प्रस्तावित असुन हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवाशांना 15 मिनिटांत बोरिवली येथे पोहचता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच येत्या दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकिकडे अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दिवसरात्र काम करणारे मुख्यमंत्री कितीही धावपळ, गडबड आणि कामाचा व्याप असेल तरी ठाण्यासाठी आपल्या हक्काच्या माणसांसाठी नक्की वेळ काढून येतात याची आज रंगायतनमध्ये ठाणेकरांना अनुभूती आली. यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाचे 11 व्या आवृत्तीचे, तर ‘दुसरे वादळ’ या पुस्तकाचे व गुढीपाडव्याला प्रकाशित होणाऱ्या ‘बेधडक’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.