Latest Marathi News

BREAKING NEWS

वर्धामध्ये काँग्रेसला झटका नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश

0

वर्धा |

अजित पवार व सहकारी सत्तेच्या वाटेवर भाजपच्या संगतीत जाण्याच्या तयारीत असतांनाच दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लोभ दाखवीत काँग्रेसचे नगराध्यक्ष शिंदे सेनेकडे धावले आहे. कारंजा नगरपंचायतीच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश केला. कारंजा नगरपंचायतीत काँग्रेसचे नऊ तर भाजपचे आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमतात काँग्रेसची सत्ता आली होती. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात या तालुक्यात काँग्रेसने डंका वाजविला. मात्र पक्षांतर झाल्याने त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान देण्यात आले आहे. नगराध्यक्ष स्वाती भिलकर, उपाध्यक्ष भगवान बोवाडे तसेच सदस्य संजय मस्की, विशाल इंगळे, राजेंद्र लाडके, हेमंत बन्नगरे, निता मिश्रा, मधुबाला दुधकवडे कमलेश कठाने व स्वीकृत सदस्य नितीन दर्यापुरकर यांनी प्रवेश घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांचे खास समजल्या जाणारे किरण पांडव यांनी यात मोलाची भूमिका पार पाडल्याचे म्हटले जाते. काँग्रेस नेते अमर काळे म्हणाले की बस अपघाताची मोठी दुर्घटना घडली त्याच दिवशी हा सोहळा झाला. हे वाईटच. मुख्यमंत्र्यांनी किमान संवेदनशीलता दाखविणे अपेक्षित होते. असो मला पक्षांतर झाल्याने फरक पडणार नाही. जे गेलेत त्यांनी प्रथम राजीनामा देत परत निवडून येण्याची हिंमत दाखविणे अपेक्षित होते. आता नव्याने कारंज्यात पक्ष बांधणी करू. काँग्रेस कार्यकर्ते पक्षातच आहे. परत झेंडा फडकवू, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.