पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजधानी दिल्लीत सहाव्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. देशातल्या काही मोजक्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. ब्रिटनमधल्या काही शहरांमध्ये आता 5G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबतच तिचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो का, हा प्रश्नही विचारला जातोय.
दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँडसारख्या काही देशांमध्ये आणि अमेरिकेतल्या काही प्रातांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे आणि येत्या दोन-चार वर्षात इतरही देशांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरू होणार आहे. असं असताना या तंत्रज्ञानाविषयी कोणती चिंता भेडसावत आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी काही ठोस पुरावे आहेत का?
पूर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G नेटवर्कदेखील रेडियोलहरींच्या सिंग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अॅँटेना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात. आपण कायम विद्युतचुंबकीय किरणांनी वेढलेलो आहोत. टिव्ही, रेडियो याच लहरींवर चालतात. इतकंच नाही तर मोबाईल फोनसारख्या तंत्रज्ञानातही यांचा उपयोग होतो. अगदी सूर्यप्रकाशासारखा नैसर्गिक स्रोतही त्याला अपवाद नाही.
पूर्वीच्या मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत 5G तंत्रज्ञानात दीर्घ लहरींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाचवेळी अधिकाधिक उपकरणांना इंटरनेट मिळू शकतं. शिवाय, इंटरनेटचा स्पीडही जास्त असतो. शहरी भागांमध्ये या लहरी कमी अंतर कापू शकतात. त्यामुळे 5G नेटवर्कला पूर्वीच्या नेटवर्कपेक्षा अधिक ट्रान्समीटर्स मास्टची गरज असते. ते तुलनेने जमिनीच्या अधिक जवळ उभारले असतात.
चिंतेचं कारण काय?
सर्व मोबाईल फोन तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे अनेकांना आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती काहींना वाटते.
2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं होतं, “मोबाईल फोनच्या वापरामुळे आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत असल्याचं आढळलेलं नाही.”
इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या संस्थेसह जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे (ज्याचा मोबाईल सिग्नल हादेखील एक भाग आहे.) ‘कॅन्सर होण्याचा धोका उद्भभू शकतो’ असं म्हटलेलं आहे.