सोलापूर |
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने विधवा सन्मान सण साजरा करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सरपंच अनिता पवार, युवकार्यकर्त्या सुप्रिया पवार यांनी ‘विधवा प्रथा बंद करा’ हे पथनाट्य सादर केले. मुधोजी कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर इंगळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख व माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयचे मराठी विभाग प्रमुख डॉ. संगीता पैकेकरी यांनी मागदर्शन केले.
यावेळी विधवांना हळदी कुंकू देवून त्यांना मिठाई देण्यात आली. ‘विधवा प्रथा’ असे लिहिलेले कागद मेणबत्तीवर जाळून हिवरवाडी ग्रामस्थांनी विधवा प्रथा कायमची बंद करण्याचा निर्धार केला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. प्रदीप मोहिते यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला. प्रा. लक्ष्मण राख, डॉ. संगीता पैकेकरी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य सुधीर इंगळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वैधव्यावर मात करून इतिहासाला भरीव योगदान दिल्याची आठवण करून दिली. त्यांचा आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर पवार, बिभीषण सांगळे, आल्फिया शेख, राम गोडगे, अमृता आरणे, रिया परदेशी, साक्षी बोबलट, संगीता गोविंद पवार, जावेद मुलाणी यांनी परिश्रम घेतले.