सोलापूर |
देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा विनियोग केला जातो. त्यामुळे या निधीच्या संकलनात सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे. तसेच माजी सैनिकांच्या काही समस्या असतील तर संबंधित शासकीय विभागाने त्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी – 2022 संकलन शुभारंभ व ध्वजनिधी – 2021 चे उत्कृष्ट ध्वज निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते, बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, कर्नल (नि.) नवीनकुमार बेंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती शमा पवार, महानगरपालिका उपायुक्त विजय खोराटे, तहसीलदार (सर्वसाधारण) अंजली मरोड आदिंसह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिक विधवा उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा विनियोग केला जातो. शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2021 साठी एक कोटी, 54 लाख, 41 हजार रूपयांचे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते. ध्वजदिन निधी संकलनाची 91 टक्के उद्दिष्टपूर्ती आपल्या जिल्ह्याकडून झाल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वर्षीच्या उद्दिष्टातील उर्वरित निधी व या चालू वर्षातील निधी संकलनाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, माजी सैनिकांच्या पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या तक्रारींचा तालुका, जिल्हा स्तरावर तत्परतेने निपटारा करण्यात येईल व माजी सैनिकांना मदत व सहकार्याची पोलीस विभागाची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात शमा पवार यांनी ध्वजदिनाचे महत्त्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन श्रीमती भूमिका वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, वरिष्ठ लिपिक सुनील जाधव, लक्ष्मण कोळी, गुरुनाथ कुलकर्णी, वसतिगृह अधीक्षक सतिश रासकर, अधिक्षिका सैनिकी मुलींचे वसतिगृह श्रीमती आशादेवी किवडे तसेच राजेसाहेब शेख, मारुती शेवडे, उमेश राठोड यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख, माजी सैनिक संघटना, नागरिक, विविध संस्था, शाळा व महाविद्यालयातील एन.सी.सी कॅडेट व प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.