मुंबई |
राजकारणात काय घडेल नि काय होईल याचा नेम नाही. एकीकडे प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांवर टीका करत असतानाचा आता आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे पुढे आले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भेटीवर आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमागाचं काय कारण आहे? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, ” असं शरद पवारांनी सांगितलं.
“आंबेडकरांशी आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळ्या असतील, तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा केली आहे. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडं पाठवणार आहे. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल. यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, ” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
२०२४ च्या निवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का? वंचित आघाडीही बरोबर असेल का? असा प्रश्न शरद पवार विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, “वंचित आघाडीबरोबर आमची चर्चा झाली नाही. वंचितशी आमची चर्चा कर्नाटकातील मर्यादित जागेशिवाय दुसरी कोणतीही झाली नाही. सध्यातरी महाविकास असून, एकत्र लढण्याची इच्छा आहे. इच्छा नेहमीच पुरेसी नसते. जागांचं वाटप अजून ठरलंच नाही. ”