Latest Marathi News

BREAKING NEWS

लातूर मनपा आयुक्तांनी डोक्यात झाडून घेतली गोळी

0

सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार
लातूर : प्रतिनिधी

लातूर महापालिकेचे एक कार्यक्षम आयुक्त म्हणून बाबासाहेब मनोहरे यांची ओळख आहे. महापालिकेत प्रशासकराज असताना त्यांनी कोणालाही न जुमानता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या कार्यशैलीतून आपली ओळख निर्माण केली. असे असताना अचानक शनिवारी रात्री उशिरा त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. मात्र, आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण कळू शकलेले नाही. सध्या त्यांच्यावर लातूर येथील सह्याद्री हॉस्पीटल येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी सव्वाअकराच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. यातून ते बचावले. मात्र, या या वृत्ताने लातूरमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. घटनेचे वृत्त समजताच अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकारण्यांनी रुग्णालयात जाऊन मनोहरे यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. बाबासाहेब मनोहरे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. बाबासाहेब मनोहरे हे अडीच वर्षापासून लातूर येथे मनपा आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी धाराशिव, नांदेड याठिकाणी काम केले आहे.

बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री शासकीय बंगल्यातील त्यांच्या खोलीत डोक्यात गोळी झाडून घेतली होती. गोळीचा आवाज ऐकून त्यांच्या घरातील लोक खोलीत धावत गेले. तेव्हा मनोहरे जखमी अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे मनोहरे यांच्यावर रविवारी पहाटेच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु गरज पडल्यास पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. यावेळी महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही रुग्णालयाबाहेर उभे होते. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याबाबतचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

मनोहरे यांनी डोक्याच्या उजव्या बाजूने स्वत:च्या पिस्टलातून गोळी झाडल्याने डोक्याची कवटी फुटून गोळी आरपार गेली. त्यामुळे कवटीचे तुकडे मेंदूत पसरले आहेत, अशी माहिती डॉक्टरांची दिली. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात जी गोळी झाडून घेतली, ती उजव्या बाजूने आरपार निघाली. बाबासाहेब यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली. तुटलेल्या कवटीचे काही तुकडे मेंदूत पसरले. सध्या डॉ. किनीकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.