पुणे |
पिंपरी चिंचवडचे आमदार स्व. आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. एका दिलदार नेत्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणारी नाही, त्यांचे योगदान भाजप कधीच विसरणार नाही असे प्रतिपादन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लक्ष्मण जगताप हे आपले लाडके आणि उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मोठ्या व्यक्तीची प्रचिती त्याच्या कार्यातून येते. शरीराने फिट असणारा सहकारी मित्र गमावला. संघर्षातून तयार झालेले नेतृत्व कधीच हार मानत नाही. आजाराच्या काळातही त्यांच्यात इच्छाशक्ती प्रचंड होती. लक्ष्मण जगताप यांच्या नावाने शहरात विधी (लॉ) महाविद्यालय सुरू केले जाईल. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मण जगताप यांचे नाव दिले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. १४) सर्व राजकीय पक्षांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शोकसभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, क्रीडामंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.