मी इतका छोटा माणूस नाही, माझ्या मनात श्रद्धा आहे, माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले आहेत – चंद्रकांत पाटील
औरंगाबाद |
भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात वक्तव्य केले कि, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली होती. पाटील यांच्या या विधानाचा विपर्यास करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. चंद्रकांत पाटील यांनी या विधानावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
विरोधकांनी सोशल मीडियावरून पाटील यांच्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे.यावर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले कि, आता जर यांचं म्हणणं असेल तर वर्गणी म्हणायला पाहिजे होतं, तर त्या काळात हे शब्द नव्हते, त्यावेळी भीक मागून मी संस्था उभी केली असं प्रचलित वाक्य होतं. माझं पाहिलं वाक्य काय आहे, सगळ्यांबद्दल आदर करणार वक्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांनी शाळा सुरु केल्या असं मी म्हटलं आहे. ते सगळे सरकारवर अवलंबून राहिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या. भीक म्हणजे काय, आज आपण नवरात्र, गणपतीला , आंबेडकर जयंतीला जे जाऊन फिरतो, तेच म्हणतो ना, आम्हाला जयंती साजरी करायची आहे. आम्हाला वर्गणी द्या. मी काय केलं. खांदयावरच गमछा काढला आणि ऍक्शन करून वक्तव्य केलं. जर माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
माझ्या मनात श्रद्धा आहे, माझ्या रक्ता- रक्तात आंबेडकर, महात्मा फुले आहे. मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे पाटील म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्याबद्दल मला आदर आहे. नुसता आदर नसून श्रद्धा आहे. त्यामुळे मला कुणी शिकवण्याची गरज नाही. शिका आणि शहाणे व्हा, असा नारा दिला नसता तर फार मोठ्या प्रमाणात हा समाज अशिक्षित राहिला असता , असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.