मुंबई |
बेळगाव सीमाभागात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर पुढील 48 तासात परिस्थिती नियंत्रणात आली नाही, योग्य भूमिका घेतली नाही, तर मी बेळगावला जाणार, असे पवार यांनी म्हटले आहे. अनुचित प्रकार घडल्यास यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जबाबदार ठरणार, असेही पवार म्हणाले.
बेळगाव सीमाभागात आज कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली आहे. झालेला प्रकार निषेधार्ह असून सीमाभागातील परिस्थिती गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने हे घातक आहे, जर परिस्थिती चिघळली तर त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना जबाबदार धरले जाईल, असे पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव असताना बेळगावात पोलिस व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये आज वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बेळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली असून याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावला भेट देणार होते. या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, हा दौरा रद्द केल्याचे सांगितले.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद चिघळला असतानाच मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा आजचा बेळगाव दौरा तुर्तास रद्द करण्यात आला आहे. देसाई यांनी ही माहिती देतानाच आज बेळगावला जात नसून हा दौरा भविष्यात केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच कर्नाटक सरकारची भूमिका चुकीची असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान शिंदे सरकारची ही माघार आहे, त्यांचा हा पराभव आहे, अशा शब्दात विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.