Latest Marathi News

BREAKING NEWS

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0

कोल्हापूर |

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आहे. या महोत्सवाची पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली कणेरी मठ येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सिद्धगिरी मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी, विश्वस्त उदय सावंत व संतोष पाटील, समन्वय अधिकारी अमेय हेटे, कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद महाडकर व संदीप वेंगुर्लेकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, पंचमहाभूत महोत्सवाला राज्यासह देशभरातून लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा महोत्सव उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाचे चोख नियोजन करुन नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाव्यात.

कणेरी मठ येथे मोठ्या प्रमाणात होणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने चोख नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बैठकीत सांगितले.

काडसिद्धेश्वर महाराज यांनी पंचभौतिक सोहळ्याविषयी माहिती दिली. अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साधारण 500 एकर जागेमध्ये होणाऱ्या या उत्सवामध्ये जगभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर व सुमारे 30 लाख नागरिक उपस्थित राहतील. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या महोत्सवाचे स्वरुप असेल. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती सहभागी होणार असून विविध विद्यापीठांचे कुलगुरु, उद्योगपती, आसपासच्या राज्यातील विद्यार्थी, शेतकरी देखील या महोत्सवात सहभागी होणार आहेत. देशी गाई, म्हैशी, श्वान, पशुपक्षी यांचे महत्त्व विषद करणारे प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात येतील. शेतीला उपयुक्त सुमारे 300 यंत्रांचे प्रदर्शन या ठिकाणी असेल. महोत्सवात सहभागी सुमारे 30 हजार नागरिकांच्या राहण्याची सोय सध्या करण्यात आली आहे. लोकसहभाग आणि सर्वांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी करुया, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केले.

विश्वस्त उदय सामंत व संतोष पाटील यांनी महोत्सवाची सादरीकरणातून माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.