नागपूर |
“हे मराठी माय माझे मी तुझा गे बाळ आहे…” मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या या गौरव गीताच्या डीव्हीडीचे लोकार्पण आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला काल स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मराठी भाषेसाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, हे प्रासादिक आणि सुमधुर गीत जगभरातील समस्त मराठी भाषकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला. कवी अनिल शेंडे यांनी सात कडव्यांमध्ये शब्दबद्ध केलेल्या या गीताला संगीतकार अशोक गोकर्ण यांनी स्वरसाज चढविला असून, गायक अमर कुळकर्णी यांचा आवाज या गीताला लाभला आहे.
प्रमुख अतिथी पत्रकार विनोद देशमुख यावेळी म्हणाले- अनिल शेंडे यांचे शब्दांवर विलक्षण प्रभुत्व असल्याचे त्यांच्या अनेक कविता, गीतांमधून जाणवते. प्रासंगिक शीघ्रकाव्य करण्यात तर त्यांचा हातखंडाच आहे. मायमराठीची अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो, यासाठी शुभेच्छा.
गौरव गीत डीव्हीडीच्या निर्मात्या सौ. अस्मिता शेंडे, सौ. गोकर्ण आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मराठी गौरव गीत
हे मराठी माय माझे
मी तुझा गे बाळ आहे
माय तुझिया स्पंदनांशी
जुळली माझी नाळ आहे ।।
माऊली तू ज्ञानियाची
नामयाची अन् तुक्याची
रम्य हा इतिहास आणि
भावी उज्वल काळ आहे ।।
नाथ, चोखा, सावत्याची
आणि जनीची माय तू
तू विठूच्या राउळातिल
नादमधुरा टाळ आहे ।।
तूच वाणी पंडितांची,
शाहिरांची अन् कविंची
तू समर्थ्यांची खनी अन्
भारतीचे भाळ आहे ll
तू शिवाजीची भवानी
लक्ष्मीचे त्या तेज तू
प्रेरणा क्रांतिवीरांची
दुष्मनांची काळ आहे ।।
भाग्य अमुचे थोर मधुर
तव स्तन्य आम्हा लाभले
शब्द शब्द तुझिया मुखीचा
बघ किती वेल्हाळ आहे ।।
ह्या जगी असतील कितिही
आणखी भगिनी तुझ्या
तूच अमुची धारिणी अन्
तू अम्हा आभाळ आहे ।।
मराठी गौरव गीताचे लोकार्पण करताना नितीन गडकरी. शेजारी गायक अमर कुळकर्णी, कवी अनिल शेंडे, अस्मिता शेंडे, संगीतकार अशोक गोकर्ण, विनोद देशमुख उपस्थित होते.