Latest Marathi News

BREAKING NEWS

मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन

0

नागपूर |

व्यापारी संकुले, जुनी वस्ती, रेल्वे क्रॉसिंग तसेच काळाच्या ओघात अतिक्रमणामुळे निमुळते झालेले रस्ते व त्यातून दररोज उद्भवणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य नागपूरची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या एक हजार कोटीच्या उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन केले. पुढील तीन वर्षात हा 9 कि.मी. लांबीचा उड्डाणपूल पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उभय नेत्यांनी आज गोळीबार चौक व सक्करदरा चौक येथील जाहीर सभांमध्ये केली.

मध्य नागपूरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-डी वरील इंदोरा चौक ते दिघोरी चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन उभय नेत्यांनी या परिसरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज केले. या दोन प्रमुख सभांसोबतच रामझुला ते एलआयसी चौक आणि रिझर्व बँक चौक पर्यंतच्या वाय आकाराच्या उड्डाणपूलाचे आणि नवीन लोहापूल भूयारी मार्गाचे लोकार्पणदेखील त्यांनी केले.

या ठिक-ठिकाणच्या कार्यक्रमांना खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, कृष्णा खोपडे, माजी खासदार विकास महात्मे, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत खोडस्कर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामार्ग विभागाचे आशिष अस्थी, नरेश वडेटवार, डॉ. अरविंद काळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.