मंत्री चंद्रकांत दादा पाटील व शंभूराज देसाई यांचा 6 डिसेंबरला बेळगाव दौरा ; ट्विटरद्वारे चंद्रकांतदादाची माहिती
मुंबई |
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या दोघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून हे दोन्ही मंत्री ३ डिसेंबरला बेळगावला भेट देणार होते. परंतु आता ही भेट ३ डिसेंबर एवजी ६ डिसेंबर रोजी होणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
मागील काही दिवासंपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यांनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीका केली आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलच तापले आहे. तर सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील व शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका होती. या पार्श्वभूमीवरच हे दोन्ही मंत्री ३ डिसेंबरला बेळगावला जाणार होते, परंतु आता हा दौरा ६ डिसेंबर रोजी होणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.