कोल्हापूर |
पुण्यातील फिरत्या वाचनालयाला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. कोल्हापुरातही त्याच धर्तीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फिरतं ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी बालवाचनालयही १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. वाचकांना ही सुविधा मोफत मिळणार असून या यातून तरूण पिढीला वाचनाची आवड लागेल आणि वाचनसंस्कृतीचं संवर्धन होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, वाचन संस्कृती वाढावी म्हणून कोल्हापूरमध्ये एक फिरत वाचनालय सुरु केलं. शाळांच्या गेटवर, मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर तिथे उभं राहायचं. जे पुस्तक वाचायचं असेल ते घ्यायच. यासाठी कोणतीही फी नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
पुण्यामध्ये कोव्हिडच्या काळात घरामध्ये राहून लोक बेजार झाले होते. म्हणून मी प्रत्येक सोसायटीमध्ये १०० पुस्तकं दिली. जवळपास १०० कॉलनीजमध्ये आपण पुस्तकं दिली. दिवसभरामध्ये ते खाली यायचे. राउंड मारायला त्यावेळी ते पुस्तक वाचायला घेऊन जायचे. यातूनच फिरत वाचनालयाची कल्पना सुचली आणि या दहा हजार पुस्तकांचं फिरत वाचनालय पुण्यात खूपच सुंदर सुरु आहे, असे पाटील यांनी म्हटले.

पुण्यातील या गाडीचे थांबे ठरले आहेत तसेच कोल्हापुरातील या गाडीचे देखील थांबे ठरले आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ या वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. कारण त्यांनी लोकांनी खूप शिकावं याचा आग्रह धरला त्यामुळे तेथे याचे उदघाटन करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
यावेळी पाटील यांनी सल्ला दिला कि दर महा एक साहित्यिक ऍक्टिव्हिटी करावी. एखाद्या पुस्तकावर परिसंवाद, एखाद्या पुस्तकाचे परीक्षण असे उपक्रम राबवावे. खूप वाचा, विचारपूर्वक वाचा, त्याच मनन करा, त्याची चर्चा करा, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.