लातूर |
येथील अष्टविनायक प्रतिष्ठानच्या गणेश हॉलमध्ये गुरुवारी शिकवणी चालक, वसतिगृह संचालक व संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ. सोमय मुंडे यांचा शाल, पुष्पहार घालून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकूल व अन्वी गर्ल्स हॉस्टेलचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे व प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांनी सत्कार केला.
या प्रसंगी शहर पोलिस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, रमेश भुतडा, विजय जाधव, विकास कदम, डॉ. भारत घोडके, गोडभरले यांच्यासह दामिनी पथक, चालीa पथकाचे अधिकारी, शिकवणीचालक वसतिगृह संचालक व संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते. याच लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील आगळा – वेगळा ‘पॅटर्न’ सबंध राज्यभरात नावलौकिक आहे. त्यामुळे राज्यभरातून विद्याथीa व पालकांचा लोंढा लातुरात येतो.
या विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी लातुरात पहिल्यांदाच पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधितांच्या अडचणी समजून घेऊन तसेच पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या यंत्रणांची माहिती देत पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना सूचना करीत विद्यार्थी व यातील निगडीत सर्वांच्या सुरक्षीततेसाठी पोलिस यंत्रणा सक्षम असल्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन सुरवसे यांनी केले तर आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक शहाणे यांनी मानले.