Latest Marathi News

BREAKING NEWS

“पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार..!”- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे |

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर’च्या सभागृहात आयोजित ‘मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एज्यु फेस्ट -२०२२’ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात भूमिका मांडली. पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये इथल्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील यांनी यावेळी म्हटले कि, व्यवसायाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास आणि गरजेप्रमाणे देण्यात येणारे शिक्षण यांचा समावेश तर नवीन शैक्षणिक धोरणात आहेच. पण त्याच बरोबरीने संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विज्ञानालाही यामध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल. यापुढे ज्या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचं शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रीत करतील, त्यांनाच परवानगी देणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रात इथल्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावं, असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना केलं. शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या समन्वयाने शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील कामाची माहिती दिली पाहिजे. त्यांना रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे शिक्षण द्यायला हवे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक डॉ. प्रशांत गिरबने, सीओईपीचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पवार, भारत अगरवाल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.