अमरावती |
शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक झाल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार किरण सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.