पुणे |
जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.
विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.

चंद्रकांत पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.