नोटबंदीवरून मोदीजींना लक्ष्य करू बघणाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं लगावलेली ही सणसणीत चपराकच – चंद्रकांत पाटील
मुंबई |
आज सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदिच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, सुप्रीम शिक्कामोर्तब… मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं केलेली नोटबंदी योग्यच होती, असा निर्वाळा आता सुप्रीम कोर्टानंही दिला आहे. नोटबंदीवरून मा. मोदीजींना लक्ष्य करू बघणाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं लगावलेली ही सणसणीत चपराकच आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ७ डिसेंबर पर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला वैध असल्याचे म्हटले आहे.