नवरात्र माळ तिसरी तारुण्य विवाहपूर्व समुपदेशन वर आजचा अग्रलेख..
नवरात्र माळ तिसरी तारुण्य विवाहपूर्व समुपदेशन वर आजचा अग्रलेख..
नमस्कार मित्र मैत्रिणींनो..
मला खूप आनंद होत आहे की या लेख मालेला एवढं प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.. मी तुम्हा सर्वांची खूप ऋणी आहे आणि माझ्या माझ्या लिखाणातून जास्तीत जास्त माहिती तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा आज पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहे.
बालपण आणि किशोरावस्था यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तारूण्य…
आयुष्याचे स्वातंत्र्य उपभोगण्याचा सर्वात मोठा काळ म्हणजे तारुण्य…
आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय घेण्याचा काळ म्हणजे तारुण्य..
आणि एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात जास्त उलाढालीचा काळ म्हणजे तारूण्य…
उलाढालीचा यासाठी, कारण या वयामध्ये एकीकडे त्यांचे करियर, शिक्षण, मैत्रिणी, कुटुंब या गोष्टी असतात तर दुसरीकडे पुर्ण जगाला त्यांच्या लग्नाची घाई झालेली असते. लग्न झाले असेल तर मूल होण्याची घाई झालेली असते , आणि लग्न होऊन मूल देखील झाले असेल तर दुसरे मूल होण्याची घाई झालेली असते…
परंतु या गोष्टींसाठी त्यांना मार्गदर्शन मात्र कोणीही करायला तयार नसते…
” लग्न काय सगळ्यांनाच करायचं असतं, मुलं काय लग्नानंतर होतच असतात, एकाच मुलावर थोडी थांबायचं असतं, एकाला जोडीदार दोन पाहिजेत!” एवढीच ठेवणीतली वाक्य कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांना वारंवार ऐकवली जातात..
चूल आणि मूल यातून स्त्री बाहेर आले खरी, शिक्षण घेऊन अंतरिक्षा पर्यंत तिने भरारी सुद्धा मारली, परंतु मनाजोगते करिअर घडवताना निसर्गाने दिलेली जबाबदारी सुद्धा पेलताना तिची दमछाक मात्र दिवसेंदिवस जास्त होऊ लागली..
“पुरुषां सारखे सर्वकाही करणे, पुरुषां सारखेच हक्क मिळवणे, पुरुषां सारखेच वागणे” या सक्षम होण्याच्या चुकीच्या कल्पनांना बळी जाऊन ती तिचे स्त्री असणे म्हणजे किती सामर्थ्यवान आहे हेच विसरून गेली..
आणि हेच कारण आहे की दवाखान्यात येणाऱ्या मानसिक तणाव ग्रस्त तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.
आज आपण या लेखामध्ये दोनच महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत.
A) तरुण मुलींचे करियर आणि लग्नाचे योग्य वय. आणि
B)विवाहपूर्व समुपदेशन.
(कालपर्यंत चे लेख पालकांसाठी होते आज पासून चे लेख त्या त्या वयोगटातील स्त्रियांना उद्देशून लिहिले आहेत.)
A) तरुण मुलींचे करियर आणि लग्नाचे योग्य वय.
१) मुलीचे लग्नाचे योग्य वय कोणते यामध्ये व्यक्तिपरत्वे मतभेद असू शकतात परंतु विज्ञान, संविधान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शरीरशास्त्र यांचा आधार घेता मुलींसाठी 21 ते 25 हे वय लग्नासाठी अतिशय योग्य वय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या वयामध्ये शरीराची वाढ पूर्ण झालेली असते. कालच्या लेखामध्ये आपण शरीरात होणाऱ्या ज्या बदलंविषयी वाचले ते सर्व बदल शरीरामध्ये झालेले असतात. मानसिक दृष्ट्या मुली नवीन बदलाना सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि समजूतदार झालेल्या असतात.
२) तसेच शरीरामध्ये मासिक पाळी दरम्यान दर महिन्यात ओटी पोटामध्ये गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या अंडाशयांमध्ये असलेली स्त्री बीज परिपक्व होत असतात. पाळी सुरू होण्यापूर्वी हे स्त्री बीज अविकसित असतात आणि त्यांची संख्या देखील पुष्कळ असते परंतु नंतर त्यांची संख्या वेगाने कमी होत जाते. पाळी सुरु झाल्यानंतर दर महिन्याला यामधील काही स्त्री बीज विकसित होण्यास सुरुवात होते आणि त्यापैकी शक्यतो एकच स्त्रीबीज पूर्णपणे विकसित होते जे गर्भधारणेसाठी कारणीभूत ठरते. परंतु वयाच्या पंचविसाव्या वर्षानंतर या स्त्री बीजांची संख्या कमी होण्यास सुरुवात होते आणि तीस वर्षे वयानंतर ती झपाट्याने कमी होते. 35 वर्षानंतर त्यांची संख्या लक्षणीय दृष्ट्या कमी झालेली असते. तसेच मुलीला पीसीओडी हा आजार असेल तर अपरिपक्व स्त्री बीजांची संख्या अजूनच वाढलेली असते.
३) हे सर्व सांगण्याचे कारण असे की आता करिअरला अतोनात महत्त्व देण्यात आल्यामुळे भारतातील बहुतांश मुलींचे लग्नाचे वय तीस वर्षापर्यंत लांबले. गेले आहे. तसेच लग्नानंतर सेटल होण्याच्या, “एंजॉय करण्याच्या” आणि “एकमेकांना समजून घेण्याच्या” नावाखाली दोन-तीन वर्षे मूल होऊन देण्याचा गेल्या काही वर्षापासून प्रघात पडलेला आहे. त्यामुळे तिशी मध्ये लग्न झालेल्या मुली ते 33-34 वर्षाच्या झाल्यावर गर्भधारणेचा विचार सुरू करतात. आणि इथूनच दवाखान्याच्या वाऱ्या सुरू होतात.तसेच जसजसे वय वाढत जाते तसतसे गर्भावस्थे दरम्यान आईला आणि बाळाला होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स ची संख्यादेखील वाढत जाते. जास्त वय असलेल्या आयांमध्ये गर्भावस्थे दरम्यान डायबिटीस ब्लड प्रेशर यासारख्या आजाराचे तर बाळामध्ये अनेक शारीरिक व्यंग किंवा डाऊन सिंड्रोम सारखे जनुकीय आजार यांचे प्रमाण लक्षणीय असते.
४) याचे कारण लक्षात घेता सामाजिक साखळीतील प्रत्येक घटक याला सारखाच जबाबदार आहे हे लक्षात येईल. चूल आणि मूल या मधून मुलीला बाहेर काढताना तिच्या निसर्गदत्त प्रजनन क्षमतेचा विचार कधीच केला गेला नाही. निसर्गाने प्रजननाची सृजनाची जबाबदारी स्त्रीकडे दिली आहे. स्त्री शरीराची अत्यंत उत्कृष्ट आणि well engineered रचना करण्याचे काम निसर्गाने चोख पार पाडले आहे. शिक्षण आणि करिअर याच्या नादामध्ये कुठेतरी या नैसर्गिक देणगीचा प्रत्येकाला पूर्ण विसर पडला. आणि तिथूनच सुरू झाली स्त्रीची आधुनिक शारीरिक मानसिक आणि भावनिक विटंबना.
५) याचा अर्थ हा अजिबात काढू नये कि शिक्षण करियर या गोष्टींच्या मागे स्त्रीने लागू नये. तर याचा अर्थ असा आहे की मुलींना शिक्षण घेताना आणि करिअरच्या वाटा निवडतांना याचे पूर्ण भान असले पाहिजे की लग्नानंतर सृजनाची, मूल जन्माला घालण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यासाठी त्यांनी योग्य त्या वेळी योग्य त्या वयात योग्य ते निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण य बाबतीमध्ये कुटुंबाचा support किती मिळेल हे त्यांच्या हातात नसते.
६) साधारण दहावी नंतर पालकांमध्ये आणि मुलींमध्ये करियर या विषयावर सविस्तर चर्चा घडणे अपेक्षित आहे. मुलीला करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य देतानाच पुढील जबाबदारीची जाणीव करून देणे देखील तेवढेच गरजेचे आहे. सध्यातरी भारतामध्ये महानगरे सोडता बाकी ठिकाणी लग्न ही संस्था अजूनही उत्तम रित्या कार्यरत आहे. अशावेळी आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या या गोष्टीचे व्यवस्थित प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.
७) लग्न करण्याचे वय तिशीपर्यंत लांबल्यामुळे होणारी मानसिक कुचंबणा वेगळीच असते. करिअर मधून अजिबात वेळ मिळाले नसल्यामुळे जोडीदार यामध्ये नेमकी काय अपेक्षित आहे याविषयी देखील कित्येक मुली वयाच्या तीस वर्षापर्यंत देखील confused असतात. आजूबाजूचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांच्याकडून वारंवार होणारी विचारणा, एक किंवा दोन भेटीमध्ये मुलांमध्ये नेमकी काय पहायचे हे न समजणे, शरीराच्या नैसर्गिक गरजा नाकारून करियर मागे धावताना आलेले नैराश्य, वय वाढलेल्या च्या शरीरावर दिसू लागलेल्या खुणा आणि आज-काल मुलींमध्ये देखील सर्रास सुरू झाले ड्रिंकिंग आणि स्मोकिंग या सर्व गोष्टी खूप लवकर डिप्रेशनच्या दारापर्यंत घेऊन जातात.
८)आज-काल लग्न ठरवताना आधी पॅकेज किंवा इन्कम आणि मग मुलगा बघितला जातो. त्यात सुद्धा परदेशात वास्तव्य, न्यूक्लियर फॅमिली, अशा काही मागच्या पिढीसाठी अनाकलनीय परंतु या पिढीसाठी स्टेटस सिम्बॉल बनलेल्या अटी मुली सर्रास घालत असतात. तसेच लग्नानंतर तीन-चार वर्ष एंजॉय करायचे म्हणून मूल लवकर होऊ द्यायचे नाही हा देखील अलिखित नियम बनलेला आहे. परंतु या गोष्टी किती चुकीच्या आणि निरर्थक होत्या हे जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
९) ज्या मुलींना करियर करण्यामध्ये खूप जास्त स्वारस्य आहे अशा मुलींनी लग्न जोडीदार मुल होऊ देणे याविषयीचे निर्णय वयाच्या 20 ते 25 व्या वर्षापर्यंत घेऊन पालकांना विश्वासात घेऊन पटवून देणे गरजेचे आहे. याने मुली आणि पालक दोघांची पण मानसिक ओढाताण होणार नाही.आणि FUTURE PLANNING पद्धतशीर पणे करता येते. लग्नासाठी जोडीदार निवडताना कोणते निकष लावावेत यावर देखील खूप लवकर विचार होणे गरजेचे आहे.
तसेच प्रजनन शास्त्र आज कितीही पुढे गेले असले आणि या नाहीतर त्या कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला मूल होईलच याची अगदी 99.99% गॅरेंटी जरी असली तरीसुद्धा निसर्ग चक्राप्रमाणे शरीरामध्ये योग्य वयात योग्य हॉर्मोन तयार होणे, योग्य वयात योग्य अवयवांचा वापर होणे आणि योग्य वयात योग्य बदल घडणे खूप आवश्यक आहे, नाहीतर नको त्या आजारांना निमंत्रण दिले जाते हे देखील करिअरला महत्त्व देणाऱ्या मुलींनी लक्षात ठेवले पाहिजे.
१०) करिअर करताना पाठीशी भक्कम पणे उभे असणारे कुटुंब मिळण्या इतकी प्रत्येक मुलगी नशीबवान नसते. परंतु अशावेळी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांना सर्वात महत्वाचे स्थान देऊन मुलींनी निर्णय घेतले पाहिजेत. केवळ मूल जन्माला घालणं ही आपली जबाबदारी नसून त्या मुलाला त्याच्या आयुष्याची हक्काची पहिली काही वर्ष आई म्हणून देणे आपले कर्तव्य आहे हेसुद्धा मुलींनी विसरता कामा नये. याविषयी उद्याच्या लेखात सविस्तर लिहिनच.
११). उशिरा लग्न झाल्यामुळे मुल होण्यास देखील उशीर होतो आणि ज्या वयात मुलासोबत तुम्ही मैदानी खेळ खेळणे किंवा मुलाला पूर्ण वेळ देणे अपेक्षित असते त्या वयात तुमचे शरीर मात्र वार्धक्याकडे झुकू लागलेले असते. पस्तीस वर्षाची आई आणि चाळीस वर्षाचा बाबा यांचे मुल जेव्हा शाळेत जाऊ लागते तेव्हा आईने चाळीशी गाठलेली असते आणि वडिलांच्या आरोग्यावर आणि शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसायला सुरुवात झालेली असते. आणि तिथून पुढे ही सर्व साखळी लांब जाते आणि तुमच्या मुलांच्या आयुष्याच्या कोणत्याही पायरीवर तुम्ही एक आई वडील म्हणून कित्येकदा त्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत.
१२) या सर्वाचा अर्थ असा घ्यायचा का की मुलींनी करियर करूच नये आणि केवळ निसर्गाने नेमून दिले आहे म्हणून आधी लग्न करावे आणि मूल होऊ द्यावे? तर नाही याचा अर्थ असा आहे की शिक्षण आणि करिअर या विषयी कोणतेही निर्णय घेताना पुढील सर्व गोष्टींचा सर्वांगी विचार होऊन मग शक्य तितका समतोल साधण्याचा प्रयत्न केला जावा. आज-काल अनेक पुरुष घरांमध्ये पत्नीला सर्व कामांमध्ये सारखीच मदत करतात हि गोष्ट जरी खूप कौतुकास्पद असली तरीही नऊ महिने पोटात वाढवलं आणि त्यानंतरचे काही वर्ष आई म्हणून मुलांसाठी डेडीकेट करणं या गोष्टींना अजून तरी रिप्लेसमेंट नाही.
B) विवाहपूर्व समुपदेशन.
१) विवाहपूर्व समुपदेशन ही सध्या काळाची गरज बनलेली आहे . माझ्या काही कॉलेजमधील लेक्चर्स च्या दरम्यान तेथील तरुण मुला मुलीं सोबत तसेच माझ्या आजूबाजूच्या नात्यातील किंवा ओळखतील लग्नाळू मुला-मुलींसोबत मी जेव्हा-जेव्हा संवाद साधते तेव्हा तेव्हा माझ्या हे लक्षात येते की लग्न करायचं म्हणजे नक्की काय करायचं याविषयी आजची पिढी सुद्धा तेवढीच कन्फ्युस्ड आहे जेवढी पन्नास वर्षांपूर्वीची पिढी होती. टीव्ही मोबाइल, web series, आदर्श असलेले बॉलिवूड आणि हॉलिवूड सितारे या सर्वांनी मिळून या मुला मुलींच्या मनावर आता हे बिंबवले आहे की लग्न म्हणजे फक्त सेक्स. त्यापलीकडे फारशी चर्चा कोणीही करत नाही.
२) माझ्याकडे विवाहपूर्व समुपदेशनासाठी अनेक मुली येतात,(म्हणजे त्यांच्या आया त्यांना माझ्याकडे घेऊन येतात) तेव्हा मी त्यांना सर्वप्रथम सतीची गोष्ट सांगते. “सतीने तपश्चर्या करून शंकराला प्राप्त केले” , ही पुराणकालीन कथा हे सांगते की लग्न म्हणजे समोरच्या कडून आपल्या काय अपेक्षा आहेत याचा विचार करणे नसून आपण स्वतः काय आहोत याचा विचार करणे आहे. आपले सामर्थ्य वाढवणे, स्वतः ला असे तयार करणे की आपल्याला सारे काही सर्वोत्कृष्ट प्राप्त होईल, ते पण स्वतःच्या बळावर!!!
आपण एखाद्या व्यक्तीशी लग्न करणार म्हणजेच आपला उर्वरित जीवनाचा पूर्णवेळ आपण त्या व्यक्ती सोबत व्यतीत करणार. त्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडणार. त्या व्यक्तीविषयी प्रेमाची आणि समर्पणाची भावना आपल्या मनात असणार. अशावेळी तो जोडीदार म्हणून कसा असेल हा विचार करण्यापेक्षा आपण जोडीदार म्हणून किती उत्कृष्ट होऊ शकतो याचा विचार होणे जास्त गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या सोबत जन्मभराच्या नात्यामध्ये बांधताना “we should be the best version of ourselves!”. म्हणजेच लग्न करताना आपण आपल्या सर्वोत्कृष्ट शारीरिक मानसिक आणि भावनिक स्थितीमध्ये असणे गरजेचे आहे.
३) लग्नापूर्वी दोन ते तीन तासांसाठी होणाऱ्या तीन-चार भेटीमध्ये कोणतीही व्यक्ती कशी आहे हे कधीच कळू शकत नाही हे बरोबरच आहे. त्यामुळे अशावेळी आपणच आपल्याला असे बनवले पाहिजे की समोरची व्यक्ती कशीही असली तरी त्याचा परिणाम आपल्यावर न होता आपण कायम आपल्या साठी योग्य असलेल्या म्हणजेच आपल्या सर्वोत्कृष्ट शारीरिक मानसिक आणि भावनिक स्थितीमध्ये राहिले पाहिजे.
४) करियर मुळे किंवा इतर अडचणींमुळे जर लग्न ठरण्यासाठी आधीच उशीर झालेला असेल तर अशावेळी जोडीदाराची मानसिक स्थिती समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. उशिरा ठरलेल्या लग्नांमध्ये शक्यतो शारीरिक मानसिक आणि कित्येक वेळा सामाजिक अडचणी सुद्धा बघायला मिळतात. अशा वेळी मुलाने आणि मुलीने एकमेकांशी मोकळा संवाद साधून एकत्रित पणे या परिस्थितीवर मात करणे गरजेचे आहे. व्यायाम आणि आहार हे महत्त्व तर पूर्वीच्या दोन्ही लेखांमध्ये नमूद केलेलेच आहे. परंतु करियर मागे धावण्यात जर या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तर निदान लग्न ठरल्यापासून किंवा लग्नासाठी स्थळ बघण्यास सुरुवात केल्यापासून वर सांगितल्या प्रमाणे “जबाबदारी म्हणून जाणीव पूर्वक ” व्यायाम आणि आहार याकडे विशेष लक्ष द्यावे. परंतु जर लहानपणा पासूनच जीवनशैली आदर्श ठेवली तर या साठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाही हे देखील तितकेच खरे…
५) व्यायाम आणि आहार या बरोबरच आर्थिक साक्षरता मुलींमध्ये असणे प्रचंड गरजेचे आहे . Savings, online banking, share market, mutual funds या सर्व गोष्टींविषयी तिला निदान basic knowledge असणे गरजेचे आहे. पूर्वी बायका या बाबतीत पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असतं. आता तशी परिस्थिती नाही
६) “”सेक्स” या विषयावर योग्य आणि शास्त्रोक्त माहिती लग्नापूर्वी खूप कमी मुलींना असते. पण त्या बद्दल गैरसमज आणि भीती मात्र प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे सेक्स एज्युकेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. किशोरावस्थेत जरी मुलींना काही कारणामुळे सेक्स एज्युकेशन दिले गेले नसले तरी लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन या विषयी मोकळेपणाने चर्चा करून त्यांना योग्य माहिती देणे हे पालकांचे काम आहे. सेक्स विषयी असलेले अनेक गैरसमज कित्येकदा घटस्फोटाला कारणीभूत ठरतात आणि दिवसेंदिवस वेबसिरीज आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून मांडले जाणारे सेक्सचे उथळ आणि ओंगळवाणे रूप या परिस्थितीमध्ये भर घालते.
७) या पुढचा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. गेली कित्येक वर्ष सातत्याने अनेक स्त्री रोग तज्ञ स्त्रियांना cervical cancer होऊ नये म्हणून घ्याव्या लागणाऱ्या vaccine विषयी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती आणि समुपदेशन करीत आहेत. परंतु अजूनही याविषयी खूप उदासीनता आढळून येते. HPV नावाच्या व्हायरस मुळे स्त्रीला गर्भ पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होतो तसेच अजूनही काही आजार होतात. हा व्हायरस तिच्या पार्टनर कडून शरीरात प्रवेश करतो आणि यामुळेच हे vaccine लग्नापूर्वी किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित होण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे. तसेच या vaccine चे एक आणि सहा महिन्याच्या अंतराने अजून 2 बूस्टर डोस देखील घ्यावे लागतात तरच त्याचा परिणाम पूर्ण होतो . त्यामुळे 18(काही ठिकाणी लवकर देखील दिले जाते.) वर्षावरील तरुण मुलींनी हे vaccine लवकरात लवकर घेणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
तीच गोष्ट रूबेला, chickenpox (varicella zoster) vaccine ची. जर लहानपणी हे vaccine दिले गेले नसतील तर adult age मध्ये pregnancy आणि आरोग्याच्या दृष्टीने ते घेणे महत्त्वाचे आहे. या शिवाय health industry madhye काम करणाऱ्या मुलींनी , रोग प्रतिकार क्षमता कमी असलेल्या मुलींनी, कायम प्रवास करावा लागेल असे करिअर असलेल्या मुलींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने hepatitis A, Hepatitis B, pneumococcal vaccine, या प्रकारचे additional vaccine घेणे गरजेचे आहे. या सर्व vaccine मध्ये आता COVID ची पण भर पडली आहे.
८) लग्नापूर्वी पत्रिका जुळविणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आपल्या काही वैद्यकीय तपासण्या करून घेणे. मी माझ्याकडे विवाहपूर्व समुपदेशन साठी येणाऱ्या सर्व मुलं मुलींच्या खालील तपासण्या करून घेते.
Complete blood count,
Blood sugar levels,
Urine routine test,
Thyroid function test,
HIV
Hepatitis B antigen
VDRL.
या सर्व तपासण्या आरोग्य विषयी एक बेसिक आयडिया तर देतातच पण त्यासोबतच लग्नानंतर येणाऱ्या शारीरिक संबंधातून पतीकडून पत्नीला अथवा पत्नीकडून पती ला होऊ शकणारे जे आजार आहेत ते दोघांपैकी कोणाला आहेत का याचीदेखील खात्री पूर्वीच करून घेता येते आणि पुढील सर्व कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. याशिवाय मुलीचे वय, लाईफस्टाईल, रोग प्रतिकार शक्ती, अनुवंशिक आजार, वजन याप्रमाणे काही विशेष तपासण्या देखील करून घेणे फायद्याचे ठरते.
९) शेवटचे आणि सर्वात महत्वाचे. लग्नानंतर मुल कधी होऊ द्यायचे याविषयी पती-पत्नीचे लवकरात लवकर एकमत होणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्याचे प्लॅनिंग देखील व्यवस्थित प्रकारे झाले पाहिजे गर्भनिरोधक साधनांची व्यवस्थित माहिती लग्न होण्या आधीच करून घेणे त्यामुळे फायद्याचे ठरते. तसेच लग्नानंतर आणि मुल जन्माला घातल्यानंतर करिअर करण्यासाठी कुटुंबाचा कितपत आधार मिळेल याचा अंदाज मुलींनी खूप लवकर आणि जागरूक राहून घेतला पाहिजे म्हणजे आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कशाला महत्त्व द्यायचे आहे आणि त्यामध्ये कोणाची किती साथ लाभणार आहे याची कल्पना येते आणि त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाते.
१०) शेवटी एवढेच सांगेन की
🔸 आपल्या शरीराविषयी आहाराविषयी मानसिक स्थिती विषयी भावनांविषयी आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी आपण जागरूक राहणे,
🔸आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींकडे प्रश्न म्हणून न बघता त्यांच्याकडे परिस्थिती म्हणून बघणे आणि त्यातून मार्ग काढणे,
🔸आणि स्वतः वर भरभरून प्रेम करणे
या तीन गोष्टींच्या जोरावर आपला तारुण्याचा काळ बहरात जातो आणि चिरंतन टिकतो.
आजचा लेख आपल्याला आवडला असेल अशी आशा करते.
धन्यवाद.
डॉ.गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn.
बार्शी.