Latest Marathi News

BREAKING NEWS

धाराशिव नामांतर विरोधी याचिकेची २० एप्रिल रोजी सुनावणी

0

धाराशिव |

मुंबई उच्च न्यायालयात धाराशिव नामांतर विरोधी याचिकेची सुनावणी आता येत्या २० एप्रिल रोजी होणार आहे.विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर विरोधी याचिकेची वेगवेगळी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नामांतर विरोधात २८ हजार तर समर्थनार्थ फक्त ११७ अर्ज दाखल झाले आहेत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाता -जाता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले होते. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकराने त्यात थोडासा बदल करून उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले होते. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नामांतरास हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

धाराशिव नामांतर विरोधी याचिका शेख मसूद व इतर १९ आणि खलील सय्यद यांनी दाखल केली आहे. दि. २७ मार्च रोजी या याचिकेची सुनावणी झाली असता, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर विरोधी याचिकेची वेगवेगळी सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार धाराशिव नामांतर विरोधी याचिकेची २० एप्रिल रोजी तर छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधी याचिकेची २४ एप्रिल सुनावणी होणार आहे.

राज्य सरकराने आपले शपथपत्र दाखल केले असून, उशिरा शपथपत्र दाखल केल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे आणि ही फायनल तारीख राहील असे याचिकाकर्ते शेख मसूद यांनी सांगितले, धाराशिवचे नाव बदलू नये म्हणणाऱ्यांची संख्या २८ हजार असल्याने नामांतरास स्थगिती मिळेल असा विश्वासही शेख मसूद यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाज नामांतर विरोधात असून, तो रस्त्यावर न उतरता न्यायालयीन मार्गाने शांततेने लढा देईल, असेही त्यांनी सांगितले.

उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव करण्यात आले असले तरी जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असेच आहे. राज्य सरकराने तसे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. असे असताना जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडखे हे आपल्या प्रत्येक पत्रात धाराशिव जिल्हा असा उल्लेख करीत असून सुनावणी वेळी ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात येईल, असेही शेख मसूद यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.