Latest Marathi News

BREAKING NEWS

तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड, चंद्रकात पाटील यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

0

मुंबई |

राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शिफारशींना अनुसरुन केंद्र शासनाद्वारे जागतिक बँक अर्थसहाय्यित MERITE (Multidisciplinary Education and Research Improvement in Technical Education) प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाने देशातील एकूण १५ राज्यांची निवड केली असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचीदेखील निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र शासनाचे आभार मानले.

MERITE प्रकल्पासाठी देशातील साधारणत: १५० ते १७५ पदवी संस्था आणि १०० पदविका संस्थांची निवड प्रकल्पाच्या निकषांच्या आधारे केंद्र व राज्याद्वारे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प एकूण ४२०० कोटींचा असून याचा प्रकल्प कालावधी ५ वर्षांचा आहे. केंद्र शासनाने देशातील एकूण १५ राज्यांची निवड केली असून महाराष्ट्राचा समावेश आहे असे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने पत्राद्वारे कळविले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पात निवड झालेल्या प्रत्येक पदवी संस्थेला प्रकल्पाच्या कालावधीदरम्यान केंद्र शासनाकडून १० कोटी रुपये तर पदविका संस्थेला प्रत्येकी ५ कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार आहे.

राज्यातील संस्थांना या अनुदानाचा विनियोग ३ मुख्य प्रकल्प घटकांसाठी होणार आहे. संस्थांमधील प्रयोगशाळा, वर्गकक्ष व इतर शैक्षणिक सोयी-सुविधांचे आधुनिकीकरण, अभ्यासक्रमात सुधारणा, डिजिटलायझेशन, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, संशोधनास चालना देणं, नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणं आणि विद्यमान सेंटर ऑफ एक्सलन्सचं बळकटीकरण, इनोव्हेशनला आणि पेटंट्सला प्रोत्साहन देणं, संस्थांमध्ये प्रशासकीय सुधारणा उदा. व्यवस्थापन मंडळाची स्थापना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, शिक्षक वर्गाचे प्रशिक्षण, बहुशाखीय अभ्यासक्रम सुरु करण्यास अनुदान यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.