जर मोठ्या प्रमाणात नावीन्यपूर्व गोष्टी घडवायच्या असतील, संशोधन करायचे असेल, तर मातृभाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. – चंद्रकांत पाटील
मुंबई : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी निर्मित केलेल्या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांचा वितरण सोहळा मुंबई विद्यापीठ येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग यांच्या अभ्यासक्रमातील सगळीच पुस्तकं टप्प्याटप्प्याने मराठीत व्हावी, असा मानस आहे. त्यातील २० पुस्तकांचे मराठीकरण पूर्ण झाले, असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले कि, पूर्वी एखाद्या माणसाचं ज्ञान किती, त्या देशातल्या माणसाचं ज्ञान किती, देशाचं ज्ञान किती यावरून तो क्रम ठरत होता. पण अलीकडच्या १०० / १५० वर्षांमध्ये जगात मोठं कोण हे ठरवताना देशाची आर्थिक परिस्थिती कोणाची स्थिर आहे यावर तो क्रमांक ठरवला जातो.

शिक्षण मुळात मातृभाषेत मिळाल्याशिवाय, त्याच्यामध्ये विषय मुळात कळल्याशिवाय संशोधनाची त्याच्यामधून वृत्ती निर्माण होते ती होणार नाही. संशोधन सुचण्यासाठी विषय नीट समजण्याची व्यवस्था हि मातृभाषेत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रह धरला कि शिक्षण हे मातृभाषेत असावे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, विषय कळला, विषयाचा आनंद मिळाला, मग या विषयांमध्ये मला आणखी काय नवीन करता येईल हे मला सुचेल , अशाकडे हि दिशा जाईल. त्यामुळे मातृभाषेचा आग्रह महत्वाचा. नवीन सरकार आल्यावर आम्ही याला गती दिली आहे. यामुळे प्राध्यापकांनी जरी इंग्रजीतून शिकवले तरी मराठीतून वाचन केल्यावर विषय कळणे सोपे जाईल. दोन्ही भाषांमधून परीक्षा घेतल्या जातील. उत्तर पत्रिका दोन्ही भाषेतून लिहिण्याचा पर्याय आणि तपासण्याचा देखील पर्याय हळूहळू उपलब्ध केला जाईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.