उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’ चे थाटात उद्घाटन
नवी दिल्ली |
आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. यासह केंद्र शासनाकडून राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 41 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी दिली.
येथील प्रगती मैदानामध्ये आयोजित आंतराराष्ट्रीय व्यापार मेळा आज पासून सुरू झाला आहे. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री सामंत म्हणाले, राज्यात येत्या काळात 30 ते 40 हजार कोंटींची गुंतवणूक होणार असून यामाध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी राज्य शासन विविध धोरणही आखत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन श्री सामंत यांच्या झाले. या उद्घाटन प्रसंगी उद्योग व खणन विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरूपमा डांगे, लघु उद्योग विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक श्री कपाटे आदी उपस्थित होते.
राज्यात उद्योगाला अनुकूल धोरण आखले जात आहे
महाराष्ट्र उद्योग अनुकूल राज्य असून आगामी काळात राज्यात अधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी विविध महत्वपूर्ण उद्योग विषयांवर धोरण आखले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य हायड्रोजन धोरण आखणारे प्रथम राज्य आहे. येत्या काळात याचा लाभ राज्याला होईल. यासह माहिती तंत्रज्ञान संदर्भातील धोरण काही अडचणींमुळे रखडलेले आहेत. यामध्ये फेर बदल करून नव्याने माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात आहे. इलेक्ट्रीकल वाहन धोरण, कृषी उद्योग धोरण, फुटवेयर धोरण, पोलाद धोरण, चामडे (लेदर) धोरण आखण्यात येणार असल्याचे श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

पयर्टनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा तत्वत: निर्णय
राज्यात पयर्टन क्षेत्रात रोजगार संधी मोठया प्रमाणात असल्यामूळे पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा तत्वत: राज्य शासनाने रविवारी घेतला असल्याची माहिती श्री सामंत यांनी यावेळी दिली. राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ पर्यटन क्षेत्रात करीयर करणा-या तरूणांना देता येईल. यासाठी पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.
उद्योगांसाठी वीज पुरवठा अत्यंत महत्वाचा असतो. राज्यातील उद्योगांसाठी लागणारी अखंडीत तसेच सवलतीच्या दरावर वीज कशी मिळेल यासाठी उपाय योजना येत्या काळात आखून उद्योगांना वीज कमी पडू देणार असल्याचे ही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्योगांसाठी लागणारी जमीनीसाठी जमीन (land) बॅंक तयार केली जात असल्याचेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील उद्योजकांचे दिल्लीत सादरीकरण
उद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे राज्यातील उद्योजकांचे सादरीकरण येत्या फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये दिल्लीत केले जाईल, असे श्री सामंत यांनी सांगितले. याअंतर्गत राज्य शासनाने उद्योगांसाठी आखलेल्या उपाय योजनांची माहिती दिली सविस्तर रित्या पोहोचविली जाईल.
महाराष्ट्रातील बचत गटांच्या उत्पादनाला दिल्लीत मिळणार हक्काचे ठिकाण
महाराष्ट्रातील जे बचत गट दर्जेदार वस्तु उत्पादन करतात अशा बचत गटांना नेहमीसाठी देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये हक्काचे विक्रीचे ठिकाण उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती श्री सामंत यांनी यावेळी दिली. यासह आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आलेल्या महिला बचत गटांना तसेच कारागीरांना राहण्याची योग्य निवास व्यवस्था महाराष्ट्र लघू विकास महामंडळातर्फे केली जाईल, असा निर्णये श्री सामंत यांनी महिला बचत गंटाशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर घेतला.
दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रगती मैदान येथे 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” अशी आहे. महाराष्ट्राने या संकल्पनेवर विकासाचे दर्शन घडविणारे दालन साकारले आहे.
“वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” ही संकल्पना मांडताना डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत आहे. एकूण 45 स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवर स्टॉल्स आहेत. बचत गटांचे, कारागिरांचे, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगातंर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे आणि स्टॉर्टअप चे स्टॉल्स या ठीकाणी आहेत. यावर्षी महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ असण्याचा मान मिळालेला आहे.