बार्शी / सचिन अपसिंगकर :
कर्नाटकातील विजयानंतर मरगळलेल्या कॉंग्रेस जनांमध्ये आता उत्साहाचे वारे संचारले असून, नुकत्याच पाटणामध्ये झालेल्या भाजपा विरोधक पक्षांच्या एकत्रीकरण बैठकीनंतर ही भाजपा विरूद्ध सुर लावला जात आहे. बार्शीमध्ये कॉंग्रेस पक्ष कात टाकत असून मूठभर कार्यकर्ते असले तरी त्यांच्यामधली गटबाजीमात्र संपत नाही. बार्शीत कॉंग्रेसला 2006 ते 2009 या काळात राजेंद्र राऊत यांच्या रूपाने प्रभावी नेतृत्व मिळाले होते. त्यानंतर अॅडव्होकेट शिवाजीराव क्षीरसागर, प्रमोद चांगभले यांनी कॉंग्रेस जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र तत्कालीन कॉंग्रेस उमेदवार सुधीर गाढवे यांनी कॉंग्रेसचे पितळ उघडे पाडले. त्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची पुरती नामुष्की गाढवेंच्या उमेदवारीमुळे झाली. नंतर कॉंग्रेसमध्ये बार्शी परिवर्तन महाआघाडीच्या माध्यमातून सक्रिय झालेल्या अॅडव्होकेट जीवनदत्त यांचे नेतृत्व पुढे आले.
आरगडे हे ग्रामीण भागातून शहरात सक्रिय झालेले नेतृत्व होते. प्रस्थापितांच्या गळेकापू स्पर्धेमध्ये आपले स्थान निर्माण करायचं असेल तर सर्वमार्ग, व्हयुव रचना आणि पवित्रे वापरली पाहिजेत. यावर ठाम विश्वास असलेल्या आरगडेनी बार्शी शहराच्या समाजजीवनात सोशल मीडियातून खळबळ उडवून दिली. त्यांनी कॉंग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. आरगडे यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कॉंग्रेस नेत्यांशी संपर्क वाढविला, त्यांचे कार्य ठळकपणे जाणवू लागले. आरगडे यांनी पक्षकार्य करताना प्रस्थापितांची मोठी नाराजी ओढवून घेतली. त्यानंतर आरगडे यांनी मोठ्या वादळाला तोंड दिले. आरगडे त्या वादळातून लवकर बाहेर पडू शकले नाहीत. त्या प्रसंगानंतर आरगडे यांना कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची धुरा विजय साळुंखे यांच्याकडे आली.
साळुंखे यांनी कॉंग्रेसचे काम गेली अनेक वर्ष निष्ठेने केले आहे. साळुंखे हे समंजस, शांत, आणि परिपक्व विचारांचे आहेत. सर्व समावेशक वृत्तीच्या साळुंखे यांचा मोठा लोकसंग्रह आहे. तसेच साळुंखे यांचा आरोप-प्रत्यारोपांचा वादग्रस्त राजकारणाकडे कल नाही. त्यामुळे आजातशत्रू साळुंखेना कॉंग्रेसच्या जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांनी पाठबळ दिले. मात्र कॉंग्रेसमध्ये आरगडे यांचे ही समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत.
साळुंखे यांच्या शहराध्यक्ष निवडीमुळे आरगडे गट अस्वस्थ आहे. सध्या आरगडे व साळुंखे कॉंग्रेसवरील वर्चस्वसाठी पडद्या आड शह-काटशहाचे राजकारण करत आहेत.नुकत्याच झालेल्या एका कथित खंडणी प्रकरणाच्या निमित्ताने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जुगलकिशोर तिवाडी यांना त्यांचे पट्टशिष्य असलेल्या आरगडेनी गुरूदक्षिणा दिली आहे. आरगडे यांच्या या शरसंधानामुळे सध्या तिवाडी, साळुंखेंसह कॉंग्रेसजणांना देशभरात पर्यटन करण्याची वेळ आली आहे. आता कॉंग्रेसमधील कोल्डवॉरचे रूपांतर हॉटवॉरमध्ये झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बार्शीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आकाराला येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचे स्थान वाढविण्यासाठी संघटनात्मक ताकदीची गरज आहे. भविष्यात कॉंग्रेसची सूत्रे अरगडे की साळुंखेयांच्या ताब्यात राहणार याबाबत कॉंग्रेस समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.