कुकडी डाव्या कालव्यातून आवर्तन २२ मे पासून ; चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
पुणे |
अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कुकडी डाव्या कालव्यातून 22 मेपर्यंत चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिल्या.
धरणातून कालव्यात सोडलेले पाणी कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे आणि पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी बैठकीत दिल्या. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला तसेच नागरिकांना पिण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रांना वापरासाठी पाणी दिले जाते. धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे, पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील 15 कि.मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजूरीनंतर सुरुवात करावी, अशा सूचना यावेळी दिल्या.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागात मनुष्यबळ कमतरतेच्या मुद्यावर यावेळी चर्चा केली. सध्या शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. तूर्तास ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरून काम सुरू करावे, अशा सूचनाही यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.