Latest Marathi News

BREAKING NEWS

काल लिहिलेल्या गर्भवती स्त्रियांवरील पहिल्या भागामध्ये आपण गर्भधारणे कडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले, आणि त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्यात शरीरात होणारे बदल

काल लिहिलेल्या गर्भवती स्त्रियांवरील पहिल्या भागामध्ये आपण गर्भधारणे कडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले, आणि त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्यात शरीरात होणारे बदल

0

©️डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.

Ob-Gyn

बार्शी.

💛💚🖤🧡🤍❤️

नमस्कार.

#नवरात्र_माळ_सहावी

#गर्भवती_माता_भाग_दुसरा

#शरीर_मन_गर्भसंस्कार_visualisation

 

काल लिहिलेल्या गर्भवती स्त्रियांवरील पहिल्या भागामध्ये आपण गर्भधारणे कडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले, आणि त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्यात शरीरात होणारे बदल by, वेळोवेळी आवश्यक असलेल्या तपासण्या आणि प्रत्येक महिन्यात घ्यावयाची काळजी या गोष्टींचा अभ्यास केला.

आज आपण गरोदरपणाच्या दुसऱ्या बाजू विषयी जाणून घेणार आहोत. ही म्हणजे 🔺शारीरिक स्वास्थ्य,

🔺मानसिक स्वास्थ्य,

🔺गर्भसंस्कार आणि

🔺visualisation.

आज ज्या बाबी मी इथे मांडणार आहे त्यामागचे कारण असे, की निसर्गाने दिलेल्या प्रजननक्षमतेचा अर्थ केवळ आपल्यासारखे दिसणारे एक मूल जन्माला घालणं हा नसून “एक अत्यंत बुद्धिमान सुदृढ आणि उत्कृष्ट भावी पिढी तयार करणे” हा आहे. उत्क्रांती ही चालू राहणारी प्रोसेस आहे आणि पृथ्वीवरील सर्वात जास्त उत्क्रांत प्राणी असल्यामुळे आपले हे कर्तव्य आहे की आपली येणारी भावी पिढी ही सर्व दृष्ट्या आपल्यापेक्षा उत्क्रांतीच्या दृष्टीने पुढेच असली पाहिजे. या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की, ज्याप्रमाणे पृथ्वी मातेने भरभरून तिच्या सहस्त्र करांनी आपल्याला तिच्या कडील सारेकाही दिले आहे त्याप्रमाणे आपण देखील आपल्या अपत्यांना आणि भावी पिढीला भरभरून सारे काही “चांगलेच” दिले पाहिजे, तरच हे जग सुंदर आणि सुरक्षित बनेल.

१) गर्भावस्थेमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवा मध्ये आणि प्रत्येक संस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असतात. अशावेळी मातेने शरीरामध्ये होणाऱ्या लहानात लहान बदलापासून मोठ्यात मोठ्या बदला पर्यंत प्रचंड जागरूक राहणे गरजेचे आहे. त्वचा स्नायू हाडे आणि आतील सर्व अवयव यामध्ये दररोज काही ना काही बदल होत असतात. त्यामुळे मातेच्या बाह्य रूपावर आणि अंतर्गत प्रणालीवर परिणाम होत असतो. परंतु कित्येक वेळा माता केवळ बाह्य रूपाविषयी, सौंदर्याविषयी जास्त काळजी करताना दिसतात. परंतु अंतर्गत प्रणाली देखील तितकीच किंबहुना जरा जास्तच महत्त्वाची आहे.

२)गरोदरपणामध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेस मुळे त्वचेवर विशेषतः गालांवर, नाकावर काळे डाग पडतात.काखे मध्ये आणि जांघामध्ये सुद्धा काळपटपणा येतो. स्तनाग्रे(nipple)मध्ये कोरडेपणा, रक्त येणे, फ्लॅट होणे असे प्रकार आढळून येतात. गर्भाचा आकार जसा वाढू लागतो त्यासोबत त्वचा ताणली गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्स पोटावर आणि मांड्यांवर दिसू लागतात. केस प्रचंड प्रमाणात गळू लागतात किंवा कोरडे पडतात. काही जणींचे केस घाम येणे वाढल्यामुळे चिकट वाटू लागतात. त्वचा देखील कोरडी होते, तळपायावर, तळहातांवर, ओठांवर जास्त भेगा पडू लागतात डोळ्यांच्या खाली सूज येते क्वचित दात हिरड्या यांच्याशी संबंधित अडचणी तक्रारी वाढू लागतात अशावेळी ‘त्वचेचा ओलावा म्हणजेच moisturization टिकवून ठेवणे’ हे या सर्व गोष्टींना बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवते. यासाठी कोरफड, गुलाब, मुलतानी माती, पपई सारख्या फळांचा रस, बदाम तेल, ज्येष्ठ मध, चंदन तेल, तिळाचे तेल, आवळा, शिकेकाई, रिठा, संत्र्याची साल यासारखे पदार्थ वापरून घरगुती उपायांनी त्वचेची उत्तम रित्या काळजी घेणे शक्य होते. जर घरगुती उपाय यांविषयी ज्ञान नसेल किंवा करणे शक्य नसेल तर बाजारात मिळणारी उत्तम प्रतीचे नैसर्गिक पदार्थांपासून केलेले मॉइश्चरायझर आणि क्रीम्स यांचा वापर तिसऱ्या महिन्यापासूनच सुरू करू शकतो.

 

३)यामध्ये प्रामुख्याने retracted or cracked or flat nipple ही बरीच त्रासदायक गोष्ट आहे. ही लक्षात आल्या आल्या त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे. अन्यथा स्तनपान करताना बाळाला आणि आईला अडचणी येऊ शकतात. त्यासाठी गर्भावस्थेच्या तिसऱ्या चौथ्या महिन्यापासूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे क्रीम वापरून , आणि डॉक्टरांनी सांगितलेले दररोजचे उपाय करून प्रसूती पर्यंत या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. यावर सविस्तर पुन्हा कधी लिहिन.

४)शरीराच्या अंतर्गत प्रणालीची काळजी घेण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम या सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. गर्भावस्थेत पोटाचा आकार वाढल्यामुळे श्वास श्वास घेताना, जेवताना थोडा त्रास होतो. नियमितपणे प्राणायाम आणि व्यायाम करण्याची सवय असलेल्या शरीराला शक्यतो हा त्रास होत नाही, कारण अशा मातांमध्ये फुप्फुसांची क्षमता खूप चांगली असते. ज्या स्त्रियांना दिवसभर नोकरीमुळे किंवा इतर काही कारणामुळे एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहावे लागत असेल अशा स्त्रियांसाठी तर योगासने आणि प्राणायाम शरीराला लवचिकता आणण्यासाठी प्रचंड महत्वाची आहे. कारण प्रसूतीवेळी केवळ कंबर आणि पोट या भागातील स्नायू नाही तर पूर्ण शरीराच्या स्नायूंचा वापर होत असतो. आणि या स्नायूंमध्ये लवचिकपणा नसेल तर डिलिव्हरी दरम्यान आणि डिलिव्हरी नंतर त्याचा खूप मोठा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो.

५)व्यायामाचे योगासनांचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे शक्य नसल्यास चालण्याचा सर्वात सोपा व्यायाम प्रत्येक स्त्री करू शकते. परंतु हे चालणे शक्यतो सकाळच्या ताज्या आणि मोकळ्या हवेत व्हावे, तर त्याचा चांगला फायदा होईल. पंधरा मिनिटे ते अर्धा तास हा रोजचा चालण्याचा वेळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित ठेवावा. बसताना पद्मासन किंवा वज्रासना मध्ये बसावे. तसेच प्राणायामाचे ज्ञान नसल्यास निदान दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच ते दहा मिनिटे दीर्घ श्‍वसन करावे. प्राणायामामुळे गर्भाला आणि मातेला प्राणवायूचा पुरवठा योग्य प्रमाणात होऊन गर्भाची वाढ चांगली होते, शरीराची क्षमता वाढते मन उत्साही राहते शांत होते आणि झोप सुद्धा शांत लागते.

यासोबतच “ओमकार साधना” आणि “मूलाधार चक्र ध्यान” या दोन गोष्टी देखील गर्भाच्या मेंदूवर आणि गर्भवतीच्या मेंदूवर खूप विलक्षण परिणाम करतात ज्यामुळे गर्भवती स्त्री चे शारीरिक आणि मानसिक तेज वाढीला लागते आणि बाळ सुद्धा प्रज्ञावान आणि मेधावान होते..

६)सध्या अनेक ठिकाणी गर्भावस्थेमध्ये करण्याच्या व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे सर्व गरोदर मातांनी विशेष करून नोकरी करणाऱ्या मातांनी आवर्जून स्त्री रोग तज्ञ, फिजिओथेरपिस्ट अथवा योगा शिक्षकांकडून याचे व्यवस्थित प्रकारे प्रशिक्षण घेऊन घेऊन आचरणात आणावे .

७) गरोदर स्त्रीचे “मानसिक स्वास्थ्य” गर्भधारणेच्या काळापासून ते प्रसूतीच्या काळापर्यंत कसे आहे यावर गर्भाची शारीरिक आणि मानसिक वाढ अवलंबून असते. कायम आनंदी आणि शांत असलेल्या स्त्रीच्या शरीरामध्ये योग्य ती संप्रेरके योग्य प्रमाणात तयार होतात आणि माता आणि बालक दोघांना सुद्धा त्याचा फायदा होतो. गर्भवती स्त्रीने तिची दिनचर्या “अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी, सात्विक आहार आणि अध्यात्मिक संगत” अशी ठेवावी. जर शिक्षण किंवा करियर मुळे काही चांगले वाचन किंवा नवीन शिक्षण घेणे शक्य झाले नसेल, किंवा अत्यंत आवडत्या छंदाला वेळ दिला गेला नसेल तर या नऊ महिन्यांमध्ये ते आवर्जून करावे. ‘रामरक्षा’ ‘अथर्वशीर्ष’ यासारखे अत्यंत शक्तिशाली असलेले स्तोत्र नियमितपणे म्हणावे. हे स्तोत्र म्हणताना तयार होणाऱ्या स्पंदना मुळे गर्भ आणि गर्भवती भोवती आणि पूर्ण घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी या काळामध्ये टीव्हीवरील हिंसक आणि विक्षिप्त मालिका, चित्रपट तसेच मोबाईल आणि वृत्तपत्रे या सर्व गोष्टींपासून लांब रहावे या ऐवजी स्वतःवर आणि गर्भावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे. ज्या मुलींचा, स्त्रियांचा या सर्व गोष्टींवर विचार विश्वास नसेल, किंवा याचे महत्त्व पटत नसेल, त्यांना मी एवढेच सांगेन की लाखो वर्षापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या या संस्कारांना आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच ते टिकून राहिले आहेत.काळानुरूप ते वेळोवेळी कसोटीवर खरे उतरले आहेत. त्यामुळे वर उल्लेखलेल्या गोष्टी करण्यामध्ये कोणताही कमीपणा किंवा मागासलेपणा तर नाहीच परंतु झाला तर भरपूर फायदाच आहे.

८) भारतीय संस्कृती अशी महान संस्कृती आहे की जिथे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे एक “संस्कार” म्हणून बघतात आणि यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे *”गर्भ संस्कार”* …

गर्भसंस्कार ही अतिशय व्यापक गोष्ट इथे फार थोडक्यात मांडणे जरा अवघडच आहे, परंतु ‘महाभारतातील अभिमन्यू’ तसेच ‘भगवान श्रीराम’, ‘भगवान महावीर’ , आपणा सर्वांचे आदर्श ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘स्वामी विवेकानंद’ यासारखी अलौकिक उदाहरणे हेच सांगतात की या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्याची प्रक्रिया त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच सुरू झाली होती. मातेच्या आणि पित्याच्या आरोग्याचा, बुद्धिमत्तेचा अनुवंशिकतेने होणारा परिणाम तर त्यांच्यावर झालेलाच होता, परंतु त्यासोबतच गर्भधारणेमध्ये या मातांनी स्वतःवर घेतलेली मेहनत आणि स्वतःच्या वाढविलेल्या क्षमता या पुत्रांमध्ये रुजून ते सर्व अजरामर झाले. त्यामुळे गर्भसंस्कार हे निर्विवादपणे आवश्यक आहेत. मातेची जीवनशैलीच आदर्श असेल तर गर्भ संस्कारासाठी फार काही वेगळे करावे लागत नाही परंतु आजच्या काळामध्ये इच्छा असून सुद्धा ते बऱ्याचदा अशी जीवनशैली जगणे साध्य होत नाही त्यामुळे या काळामध्ये मातेने स्वतः सोबतच गर्भाकडे देखील लक्ष देऊन नऊ महिने कायम गर्भा सोबत संवाद साधणे गरजेचे आहे. गर्भामध्ये आपणाला जे संस्कार रुजवायचे आहेत त्या संस्कार मागचा कार्यकारण भाव लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हे गर्भसंस्कार बाळाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारे असावे.

९) योग्य पुस्तकांचे वाचन, योग्य व्यक्तींचा सहवास, योग्य विचारांचे आकलन, मनन, चिंतन, अत्यंत प्रभावी स्तोत्र आणि मंत्रांचे नियमितपणे उच्चारण, सुमधुर संगीत आणि कलागुणांची जोपासना या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे उपयोग करून उत्तम गर्भसंस्कार करता येतात. याविषयी अजून खात्री करून घ्यायची असल्यास आपल्या आजूबाजूला असलेली उदाहरणे डोळसपणे पहावी. ज्या मातांना गर्भावस्थे दरम्यान कोणत्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे, त्याचा परिणाम त्यांच्या अपत्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर स्पष्टपणे दिसून येतो. एवढेच काय एका आईची दोन अपत्य सुद्धा प्रचंड वेगळी असतात, आणि त्याचे कारण असते त्या त्या गर्भावस्थेमध्ये असलेली आईची शारीरिक आणि मानसिक स्थिती.

१०) आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे visualisation टेक्निक्स यालाच आपण ‘कल्पनाशक्तीचा सुयोग्य वापर ‘ देखील म्हणू शकतो. यामध्ये मातेने डोळे बंद करून शरीर पूर्णपणे शिथिल करून डोळ्यांसमोर आपल्या बाळाचे आपल्याला हवे तसे सुदृढ निरोगी तेजस्वी रूप कल्पना करून बघणे अपेक्षित आहे. तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळासोबत माता कशाप्रकारे संवाद साधेल याचे किंवा बाळाच्या बाले लीलांचे किंवा बाळाचा जन्म झाल्यानंतर घरातील एकूण वातावरणाचे चित्र मातेने रंगवावे. तसेच हे करण्याआधी आणि केल्यानंतर आपल्या सृजनशक्ती विषयी, निसर्गा प्रति किंवा देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Visualisation शक्यतो शांत स्वच्छ आणि मंद प्रकाश असलेल्या ठिकाणी करावे. हे जितके जास्तीत जास्त कल्पकतेने प्रत्यक्षात घडल्यासारखी कल्पना करू तितका याचा फायदा जास्त होतो. यामुळे बाळाचे आणि मातेचे भावनिक संबंध दृढ होतात. आईच्या मनातील भावना आणि त्यामुळे निर्माण झालेले हॉर्मोन्स बाळापर्यंत पोहोचून बाळामध्ये देखील तेच अपेक्षित गुण वाढीस लागतात.visualization टेक्निक अचेतन मनावर कार्य करून परिणाम साधते..यामध्ये स्वयंसूचना आणि बाळासाठी विशिष्ट सूचना किंवा संवाद देखील समविष्ट केले जातात.परंतु य सर्व गोष्टी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच कराव्यात.

 

आजच्या लेखाचा शेवट एवढेच सांगून करेल की *”आपल्या संस्कृतीने आपल्याला आचरण, आहार, विहार, मानसशास्त्र शरीरशास्त्र अध्यात्मिक आणि पारलौकिक आयाम यांचे भरभरून ज्ञान दिले आहे. आणि आपल्या आधुनिक वैद्यकीय शास्त्राने त्यामध्ये भर घातलेली आहे. या सर्व गोष्टींचा सुरेख संगम आपण आपल्या आयुष्यामध्ये साधला तर गर्भावस्थेच्या काळापासून सुरू झालेले हे संस्कार आपल्या अंतिम क्षणापर्यंत आपले आयुष्य समृद्ध करतील आणि अंतिम संस्कार नक्कीच मोक्षदायी ठरतील ..!”*

धन्यवाद.

©️डॉ गौरी कैवल्य गायकवाड.

Ob-Gyn

बार्शी.

Leave A Reply

Your email address will not be published.