©️ डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn.
बार्शी.
#नवरात्र_माळ_पाचवी
#गर्भवती_माता
#भाग_एक.
💛💚🖤🧡🤍
🔴भाग१)वैद्यकीय तपासणी आणि उपचार
नमस्कार.
आजच्या भागातील दुर्गा म्हणजे गर्भवती माता. सृजनाची जननी. गर्भवती स्त्रीची काळजी तिने स्वतः तर घेतली पाहिजे परंतु त्याबरोबर सर्व कुटुंबाची देखील ही जबाबदारी असते की या नऊ महिन्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात तिचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावे. तसेच मनातील आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे जेवढ्या गरजेचे आहे तेवढेच गरजेचे आहे वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करून बाळाची आणि मातेची प्रकृती व्यवस्थित असल्याची खात्री करून घेणे.
तर सुरुवात करुया..
१) गर्भवती स्त्रीचा नऊ महिन्यांचा काळ हा मुख्यत्वे तीन trimester मध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक ट्रायमेस्टर हे तीन महिन्यांचे आहे. आणि प्रत्येक trimester मध्ये करावयाच्या तपासण्या देखील वेगवेगळ्या. आहेत. साधारणपणे गर्भवती महिलेने ‘प्रत्येक महिन्यामध्ये किमान एक वेळा’ दवाखान्यामध्ये तपासणी करून घेणे अपेक्षित आहे. तसेच जर मातेला किंवा गर्भाला काही त्रास, दोष किंवा आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जास्तीच्या तपासण्या वेळोवेळी करून घेणे गरजेचे आहे . ज्या मुली पहिल्यांदा गर्भवती झालेल्या असतात त्यांनी कोणत्याही गैरसमजुतींना बळी न पडता मनातील सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे स्त्रीरोग तज्ञांकडूनच मिळवण्याचा प्रयत्न करावा. कारण कित्येक वेळा आजूबाजूला घडलेली उदाहरणे किंवा घटना पाहून मनामध्ये गर्भधारणा आणि प्रसूती या दोन्ही विषयी नको तितकी भीती बसलेली असते. अशा वेळी एकच लक्षात ठेवले पाहिजे की “प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे आणि गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा प्रत्येक स्त्रीचा अनुभव देखील त्यामूळे वेगळाच असतो.”
२) गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये शरीरामध्ये काही छोटे छोटे बदल होतात जसे की उलटी व मळमळ, किंचित वजन वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक न लागणे किंवा अन्नपदार्थांचा वास येऊन काहीही खावे न वाटणे, लवकर थकवा येणे, इत्यादी. आपल्या शरीरात वाढणाऱ्या गर्भाला आधार देण्यासाठी शरीराची प्रत्येक सिस्टिम गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून कार्यरत होते. आणि त्यामुळेच हे बदल होतात. त्यामुळे सर्वप्रथम *या सर्व बदलांकडे त्रास किंवा अडचण म्हणून न बघता शरीरातील बदल म्हणून बघून मानसिक पातळीवर ते बदल स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे* . हे सांगण्याचे कारण असे की कधीकधी उलटी मळमळ यांचा खूप जास्त प्रमाणात होणारा त्रास असह्य झाल्यामुळे “नको ती प्रेग्नेंसी!” असा विचार सुद्धा पेशंट दवाखान्यात येऊन बोलून दाखवतात. या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, उपचार देखील आहे परंतु त्या सर्वांच्या आधी या बदलांचा मनापासून स्वीकार होणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी झोपण्याच्या वेळा आणि शारीरिक व्यायाम यांचे काटेकोरपणे पालन केल्यास या अडचणी उद्भवतच नाहीत किंवा लवकरात लवकर आटोक्यात येतात.
३) पहिल्या तीन महिन्यांच्या काळात किमान एक वेळा आणि अनेमिया किंवा रक्ताचे इतर काही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक वेळा हिमोग्लोबिनची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अजूनही अनेमिया हा भारतातील स्त्रियांमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक भारतीय स्त्रियांकडे तोळाभर सोने नक्की असते मात्र शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी आवश्यकतेपेक्षा काही ग्रॅम कमीच भरते. साधारणपणे खालील तपासण्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये प्रत्येक गर्भवती स्त्रीने कराव्यात.
Complete blood count
BLOOD GROUP
URINE ROUTINE AND MICROSCOPY
BLOOD SUGAR LEVEL
HIV
HBsAg
VDRL
Thyroid function test.
Sonography:
१)Dating scan २)NT scan
या शिवाय तुमचे वय, काही complications, अनुवंशिक आजार, चालू असलेली औषधे, रक्तगट, पूर्वीच्या गर्भावस्थेत आलेल्या अडचणी यांचा विचार करता डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही जास्तीच्या तपासण्या करून घेणे महत्त्वाचे आहे.
तपासण्या सोबतच पहिल्या तीन महिन्यांमध्ये बाळाच्या शारीरिक वाढीसाठी आणि आईला होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून डॉक्टरांकडून काही गोळ्या दिल्या जातात त्यांचे नियमित पणे न विसरता सेवन करणे आवश्यक आहे.
४) पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भवती स्त्रीने खाणे, पिणे, चालणे, उठणे, बसणे या सर्व गोष्टी खूप लक्षपूर्वक करणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या शरीरा मध्ये होणारे सूक्ष्म बदल जास्तीत जास्त लक्षात घेतले पाहिजेत. या काळामध्ये गर्भ अत्यंत नाजूक स्थितीमध्ये असतो त्यामुळे तो गर्भपिशवीमध्ये व्यवस्थित रुजे पर्यंत ओटीपोटावर ताण येईल अशी कोणतीही कृती करू नये. कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव किंवा पोट दुखी दुर्लक्षित न करता ताबडतोब दवाखाना गाठला पाहिजे. कारण,कित्येकदा काही इम्युनोलॉजीकल आजारांमुळे किंवा रक्त गट न जुळल्यामुळे किंवा गर्भपिशवी मध्ये गाठी असल्यामुळे किंवा रूबेला सारख्या काही इन्फेक्शनमुळे सर्व काळजी घेऊन देखील अचानक गर्भपात होऊ शकतो. म्हणूनच कालच्या लेखात सांगितलेल्या सर्व तपासण्या आधीच करून घेणे आणि त्यावर उपाय करून मग च गर्भधारणा होऊ देणे श्रेयस्कर ठरते.
५) यानंतरचा तीन महिन्यांचा काळ ज्याला सेकंड ट्रायमेस्टर देखील म्हटले जाते, या काळामध्ये शरीरात होणारे बदल दिसून येऊ लागतात. गर्भपिशवीचा आकार वाढत जातो, त्यामुळे पोटावर स्ट्रेच मार्क येऊ लागतात, मातेला बाळाच्या हालचाली जाणवू लागतात, बाळाचे हृदयाचे ठोके पोटावरून तपासणे शक्य होते, मातेचे वजन वाढू लागते, स्तनांचा आकार वाढतो आणि त्यामध्ये दूध तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. उलटी- मळमळ, जेवण न जाणे हे त्रास बंद होऊन आता भूक वाढू लागलेली असते. चालताना उठताना बसताना हालचालींमध्ये थोडेसे बदल आपोआप होऊ लागतात. कधीकधी कंबर दुखी किंवा पायात गोळे येणे यासारखे त्रास सुरू होतात.
६) या काळामध्ये पुन्हा एकदा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी आवश्यक तेवढी आहे ना याची खात्री करून घेणे गरजेचे आहे अन्यथा बाळाच्या वाढीवर, वजनावर आणि एकंदरीत विकासावर त्याचा परिणाम होतो, तसेच माते ला देखील अत्यंत अशक्तपणा जाणवू शकतो. याशिवाय ट्रिपल मार्कर किंवा quadruple मार्कर सारख्या काही तपासण्या विशेष केसेसमध्ये करून घेण्यास सांगितल्या जातात जिथे बाळामध्ये काही व्यंग असण्याची दाट शक्यता असते. याशिवाय पहिल्या तीन महिन्यांमध्ये केल्या नसल्यास थायरॉईड आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या दोन्ही तपासण्या करून घेणे आवश्यक असते.
या काळामधली सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे सोनोग्राफी जिला ANOMALY SCAN देखील म्हणतात. या सोनोग्राफी मध्ये बाळाचे सर्व अवयव अतिशय काळजीपूर्वक रित्या तपासले जातात आणि त्यामध्ये काही व्यंग तर नाही ना याची खात्री केली जाते. याशिवाय बाळा भोवतीचे पाणी, बाळाचे वजन, आणि placenta ची जागा या महत्त्वाच्या गोष्टी देखील या सोनोग्राफीमध्ये पाहिल्या जातात. ही सोनोग्राफी योग्य त्या वेळी होणे अत्यंत आवश्यक आहे कारण जर बाळामध्ये असे काही व्यंग असतील, ज्यामुळे गर्भवती मातेला धोका होऊ शकतो किंवा त्या व्यंगामुळे बाळ स्वतंत्रपणे जगू शकत नाही, अशावेळी गर्भपात करून घेणे आवश्यक ठरते. परंतु गर्भपाताच्या कायद्याप्रमाणे हा गर्भपात ठराविक वेळेआधीच करून घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे ही सोनोग्राफी वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे.
७) या तीन महिन्यांमध्ये देखील सर्व हालचाली जपून करणे आवश्यक आहे. फार जास्त काळ उभे राहणे, गरज नसताना प्रवास करणे, न पचणारे किंवा नको त्याप्रमाणात अन्न सेवन करणे, घट्ट कपडे घालणे, चवड्यांवर बसून कामे करणे या गोष्टी या तीन महिन्यांमध्ये टाळाव्यात. झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे. अर्धा अर्धा तास उभे राहून काम न करता मध्ये पाच-दहा मिनिटं बसावे, सर्दी खोकला यासारखे आजार झाल्यास डॉक्टरांकडे लवकरात लवकर जाऊन त्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, भांडी घासणे, कपडे धुणे यासारखी कामे करताना पाटावर बसून करावीत. या क्षेत्रातील प्रमाणित व्यक्तीकडून या काळात करावयाच्या प्राणायाम आणि योगासनांचे धडे घेऊन ते नियमितपणे करावे. मानसिक स्थिती जास्तीत जास्त आनंदी ठेवावी. बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. बाळ दिवसातून किती वेळा हलचाल करते याची नोंद ठेवून प्रत्येक भेटीमध्ये ते डॉक्टरांच्या कानावर घालावे. खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय दक्ष असावे. अति गोड, अति तिखट, अति तेलकट, अति आंबट, अति खारट पदार्थांचे सेवन टाळावे.
८) गरोदर पण जसे शेवटच्या तीन महिन्यांकडे सरकू लागते म्हणजेच third trimester सुरू होते, तस तसे आईच्या मनावर येणारे दडपण वाढू लागते. गर्भाचा आकार बराच मोठा झालेला असतो त्यामुळे कित्तेकदा रात्रभर झोपणे किंवा झोपून श्वास घेणे अवघड होते. मलमूत्र विसर्जन क्रिया देखील खूप त्रासदायक होतात. वजन देखील वाढलेले असते. चेहऱ्यावर,पायांवर किंवा शरीराच्या काही भागांवर सूज आलेली असते. स्तनांचा आकार वाढलेला असतो, केस गळू लागले असतात. अशावेळी डोक्यामध्ये कायम डिलिव्हरी कधी होईल आणि कशी होईल हे विचार सुरू झालेले असतात. त्यातच नातेवाईकांची, आई, ताई, बहिणीची प्रत्येकीची “डिलीवरीची स्टोरी” ऐकून झालेली असते. त्यामुळे डोक्यामध्ये विचारांचे काहूर माजलेले असते. अशावेळी याबाबतीतील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे तुमचे स्त्री रोग तज्ञ होय. ज्या मुली पहिल्यांदाच माता बनत आहेत त्यांनी यु ट्यूब किंवा गुगल वर न पाहता डॉक्टरांशी संवाद साधून डिलिव्हरी नक्की कशी होते हे व्यवस्थित समजावून घ्यावे म्हणजे मनाची पुर्ण तयारी होते.
९) या शेवटच्या तीन महिन्यांच्या काळात सर्व तपासण्या नॉर्मल असणे अत्यंत गरजेचे आहे. हिमोग्लोबीन तपासणी आणि लघवीच्या तपासणी सोबतच जर 9 महिन्यात ब्लडप्रेशर वाढणे किंवा रक्तातील साखर वाढणे किंवा थायरॉईडचे प्रमाण कमी जास्त होणे असे बदल आढळले असतील तर त्याप्रमाणे इतर काही महत्त्वाच्या तपासण्या डॉक्टर सांगतील त्याप्रमाणेच करून घेणे आवश्यक आहे. गर्भावस्थेतील वाढलेला रक्तदाब हा मातेच्या हृदय किडनी लिव्हर यासारख्या अवयवांवर परिणाम तर करतोच परंतु त्याबरोबर बाळाला होणाऱ्या रक्त पुरवठ्यात देखील अडचण येऊ शकते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढले असता बाळामध्ये व्यंग असण्याची, किंवा बाळाचे वजन प्रमाणापेक्षा जास्त भरण्याची शक्यता देखील वाढलेली असते. या आजारांमुळे डिलिव्हरी मध्ये काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांवर अविश्वास न दाखवता पूर्वीपासूनच यावर डॉक्टरांशी सखोल चर्चा करून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे.
रक्ताच्या तपासण्या सोबतच सर्वात महत्त्वाची असते ती सोनोग्राफी. या शेवटच्या तीन महिन्यात गरजेप्रमाणे एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोनोग्राफी करावी लागू शकते. यातील शेवटची सोनोग्राफी असते ती बाळाचे वजन, बाळ डोक्याकडून आहे की पायाळू आहे, बाळाच्या आजूबाजूला पुरेसे पाणी आहे ना, तसेच PLACENTA योग्य ठिकाणी आहे का, आणि बाळाला होत असलेला रक्तपुरवठा सुयोग्य रित्या होत आहे का? या सर्व गोष्टींची खात्री करून घेतली जाते. आणि त्याप्रमाणे डॉक्टरांकडून डिलीवरीची तारीख दिली जाते आणि कोणत्या प्रकारे डिलिव्हरी होऊ शकते यावर मार्गदर्शन केले जाते.
१०) या काळात सर्वात महत्त्वाचे म्हणजे धीर धरणे. डिलीवरी चा काळ जवळ आलेला असतो, प्रत्येक जण बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो. परंतु या सर्वांमध्ये आई होणारी स्त्री मात्र मनातल्या मनात खूप जास्त गोंधळलेली असते. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणार की सिझेरियन. आत्ता या लेखामध्ये मी एवढेच सांगेन की *”सिझेरियन ही वाईट गोष्ट आहे किंवा चुकीची गोष्ट आहे हे डोक्यातून काढून टाका”* . जेव्हा सिझेरियन या प्रसूती प्रकाराचा शोध लागलेला नव्हता तेव्हा प्रसूती दरम्यान मृत्यू पावणाऱ्या मातांची आणि बालकांची संख्या जर आपण पाहिली तर सिझेरियन technique चा शोध लागण्याचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत हे आपल्या लक्षात येईल. अर्थात जर डिलिव्हरी नैसर्गिक मार्गाने होत असेल तर ती नैसर्गिक मार्गानेच झाली पाहिजे तेव्हा सिझेरियनचा अट्टाहास करू नये. कारण नैसर्गिक डिलिव्हरीचे स्वतःचे काही वेगळे फायदे आहेत आणि काही वेगळे निकष आहेत आणि सिझेरियन चे सुध्धा. . त्यामुळे जिथे आई किंवा बाळ या दोघांपैकी एकाच्या जीवाला डिलिव्हरी दरम्यान किंवा त्यापूर्वी धोका होऊ शकतो अशाच वेळी डॉक्टर सिझेरियन चा मार्ग सुचवतात. आणि हा निर्णय अतिशय वेळेत घ्यावा लागतो. नऊ महिने ज्या डॉक्टरांकडे आपण तपासणीसाठी जातो, त्यांच्यावर आपणास पूर्ण विश्वास ठेवणे कायम फायद्याचे ठरते. अट्टहास कशाचाही असला तरी तो वाईटच.
एवढे सांगून मी हे देखील सांगेल की पहिल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासून आहार, व्यायाम, मानसिक स्थिती यांचे संतुलन ठेवून निरामय आरोग्यशैली अंगीकारली तर गर्भावस्थेत देखील त्याचा फायदा होऊन नैसर्गिक रित्या प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते. परंतु असा अर्थ कोठेही घेऊ नये की “तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणून ती माझ्या पेक्षा भारी आणि मला सिझेरियन करावे लागले म्हणजे मी तिच्यापेक्षा अशक्त.”
इथे मी वर सांगितलेले माझे वाक्य पुन्हा एकदा सांगेन…..
“प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते आणि गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा अनुभव देखील प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.!”
तर आजचा लेख इथेच थांबवते. आजच्या भागांमध्ये आपण गर्भवती मातेच्या दृष्टीने आवश्यक असलेले वैद्यकीय ज्ञान आणि माहिती घेतली. उद्याच्या भागामध्ये म्हणजेच *”गर्भवती माता भाग दोन”* यामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर लक्ष देणार आहोत.
आजच्या लेखाचा आपणास फायदा झाला असेल अशी आशा करते.
धन्यवाद.
©️ डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn
बार्शी.