मुंबई | सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रीम कोर्टात लागणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तर निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास सत्ताधारी आमदार व्यक्त करत आहेत. सत्तासंघर्षांवर नेमकं काय निकाल लागणार याकडे संपूर्ण देश लक्ष ठेऊन आहे.न्यायालयाने देखील हा निकाल ऑनलाईन पद्धतीने सर्वांना पाहता येण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निकाल सर्वांना पाहता येणार आहे. अशात अंजली दमानिया यांनी ट्विट करत निकालाबाबत भाष्य केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये दमानिया म्हणतात,”अध्यक्ष परदेशात, जयंत पाटलांना ED नोटिस यावरून निर्णय या सरकार विरोधात येण्याची दाट शक्यता? निर्णय खरच जर आताच्या सरकार विरुद्ध आला, तर मात्र कोर्टाचे निकाल, आधी कसा लीक झाला, ह्यावर कोर्टालाच गांभीर्याने विचार करावा लागेल.” असे ट्विट दमानिया यांनी केले होते. यापुरववी सुद्धा राज्यातील राजकीय घडोमोडीवर अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केले होते.
माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर उर्वरित २४ देखील अपात्र होतील आणि हे सरकार कोसळेल असं राऊत यावेळी म्हणालेत. तसेच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना देखील राऊत यांनी यावेळी टोला लगावला. अपात्रतेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे देखील नाव आहे. ते अपात्र झाल्यास गद्दारांचा शिंदे गट संपून जाईल असही राऊत यावेळी म्हणाले.