मागच्या २ महिन्यापासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला उकाड्याचा सामना करावा लागत असून मुंबईकरांना आजचा दिवस दिलासा मिळणार आहे. आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली थांबणार आहे. तसेच आजपासून तीन दिवसात राज्यातील काही भागात पाऊस येणार आहे. मात्र, राज्यात मान्सूनची खरी दस्तक जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला घराबाहेर पडताना पूर्ण तयारीनेच पडावं लागणार आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे. येत्या 8 ते 12 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून महाराष्ट्रात येण्यासाठी 20 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राज्यातील काही शहरांत तापमान जवळपास 44 अंशाच्या जवळ असणार आहे. परभणी आणि अकोल्यात तापमान 44 अंशावर जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील लोक आधीच उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच आता हवामान खात्यानेही उष्णेतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे.
आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांची आजच्या दिवस का होईना उकाड्याच्या काहिलीतून सुटका झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.