मुंबई |
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील (एसएलएएसडीसी) भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेले मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयाने अटीशर्तींसह प्रत्येकी १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कदम यांचा तब्बल आठ वर्षांनी कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाले आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर बनावट कागदपत्र बनवून कोट्यवधी निधींचा अपहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना २०१५ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून मागील आठ वर्षे कदम कारागृहात आहेत. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने कदम यांना प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येकी १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
तसेच सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई आणि आसपासचे जिल्हे सोडून न जाण्याचे आणि पोलीस तपासात सहकार्य करण्याचे तसेच खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीशर्तींवर कदम यांची सुटका केली.